बागलकोट (कर्नाटक) : कर्नाटकातील बागलकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा जिल्हा प्रशासनाकडून हटवण्यात आल्यानंतर चांगलाच वाद पेटला आहे. सोनार एक्स्टेंशन येथील पुतळा विनापरवाना उभारण्यात आल्याने शहर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने 15 ऑगस्ट रोजी काढला होता. आंदोलकांनी स्थानिक प्रशासनावर कर्नाटक सरकारच्या आदेशाने काम केल्याचा आरोप केला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर आज भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढत कर्नाटकातील काँग्रेस सरकारला अल्टीमेटम दिला आहे. 25 ऑगस्टपर्यंत शिवरायांच्या पुतळ्याची सन्मानाने पुनर्उभारणी करा, अन्यथा आम्ही पुढील संघर्षाची तयारी करू अशा इशारा आंदोलनाकर्त्यांनी दिला.
बागलकोटमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा जिल्हा प्रशासनाने हटवल्याच्या निषेधार्थ भाजप, हिंदु जागरण मंचसह विविध हिंदुत्ववादी संघटनांतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे रूपांतर बसवेश्वर चौक येथे जाहिर सभेत झाले. या जाहीर सभेत जिल्हा प्रशासनाचा तसेच कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी बागलकोटचे माजी आमदार डॉ. वीरण्णा चरणीमठ, माजी आमदार नारायणसा भंडगे, भाजप पक्षाचे नेते आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांचे नेत्यांनी सरकारचा निषेध केला. यावेळी बोलताना हिंदू जागरण मंचच्या जिल्हा समन्वयक श्रीकांता होस्केरी यांनी 25 ऑगस्टपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच जागेत पुन्हा बसवावा, अन्यथा पुढील संघर्षाची तयारी करावी लागेल, असा इशारा दिला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देखील देण्यात आले.
तर आम्ही आंदोलन थांबवू
बागलकोटचे माजी आमदार नारायणसा भडंगे म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणे संदर्भात नगरपालिकेत ठराव झाला होता. वेगवेगळ्या विभागाच्या एनओसी घेऊनच आम्ही 14 ऑगस्ट रोजी शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. मात्र, तरीदेखील जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवलेला आहे. आम्ही तीन दिवस त्या ठिकाणी धरणे आंदोलन केले. त्यावेळी पोलिसांनी आम्हाला ताब्यात देखील घेतले. आज आम्ही जिल्हा प्रशासनाच्या कारवाई विरोधात बागलकोट येथे मोठा मोर्चा काढला, यामध्ये जवळपास दहा हजार लोक सहभागी झाले होते. आम्ही प्रशासनाला 25 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली आहे. प्रशासनाने स्वतःहून जर शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली तर आम्ही आंदोलन थांबवू. अन्यथा आम्ही 18 फूट उंच अश्वारूढ शिवरायांची मूर्ती त्याच जागी प्रतिष्ठापना करू.
इतर महत्वाच्या बातम्या