Solapur Doctor Suicide News : सोलापूर शहरातील तरुण डॉ. असद मुन्शी यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात आत्महत्येस कारणीभूत असल्याच्या आरोपवरून मृताच्या पत्नीसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मृत डॉ. असद मुन्शी यांचे बंधू अहमद  मुन्शी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉ. असद मुन्शी यांनी  आत्महत्या करण्यापूर्वी चिट्ठी लिहिली होती. तसेच परिवाराने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एक विडिओ देखील रेकॉर्ड केला होता.


या चिट्ठीत आणि व्हिडिओत डॉ. मुन्शी यांनी पत्नी फलकनाज नजीरअहमद सय्यद, मेहुणा डॉ. सरफराज नजीरअहमद सय्यद, सासरे नजीरअहमद सय्यद, निखत सरफराज सय्यद आणि डॉ. मिलिंद सरोदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपीनी मानसिक त्रास दिल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे डॉ. मुन्शी यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिट्ठीत आणि रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओत केले होते.


त्यानंतर डॉ. असद मुन्शी यांचे बंधू अहमद मुन्शी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या म्हटले आहे की, आरोपीनी संगनमत करून  मयत डॉ. असद मुंशी यांना मानसिक त्रास दिला. तसेच डॉ. मुंशी हे त्यांच्या मुलीला पाहण्यासाठी गेले असता त्यावेळेस मुलीला पाहू न दिल्याने यांना मानसिक त्रास झाला. तसेच जळगाव येथे राहणारे डॉ. मिलिंद सरोदे यांनी देखील डॉ. असद मुन्शी यांना फोनवर त्यांची पत्नी फलकनाज हिच्यासोबत माझे प्रेम संबंध आहेत असे बोलून मानसिक खच्चीकरण केले होते. या सगळ्या कारणांनी ते मानसिक तणावात होते. त्यांच्या या त्रासाला कंटाळूनच डॉ. असद मुन्शी यांनी 3 डिसेंबर 2022 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्वतःचा जीव गमवला, अशी फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे.


त्यांच्या या फिर्यादीवरून मृत डॉ. मुन्शी यांच्या पत्नी फलकनाज नजीरअहमद सय्यद, मेहुणा डॉ. सरफराज नजीरअहमद सय्यद, सासरे नजीरअहमद सय्यद, निखत सरफराज सय्यद आणि डॉ. मिलिंद सरोदे यांच्यावर भांदवि 306, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पेटकर हे करीत आहेत.


सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असणारे डॉ. मुन्शी 


डॉ. असद मुनशी हे सोलापुरात हिजामा (कप थेरपी) स्पेशलिस्ट म्हणून काम करत होते. सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असणारे डॉ. मुन्शी यांचा मित्रांचा संपर्क देखील मोठा होता. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी कळताच साऱ्या मित्रांना धक्काच बसला. इतरांच्या मदतीला नेहमी धावून जाणारा व्यक्ती अशा पद्धतीने कृत्य करू शकतो यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. त्यांना सोलापूरच्या एका सहकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेव्हा त्यांच्या अनेक मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील त्यांच्या परिवाराची भेट घेऊन धीर दिला. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक मित्रांनी आपल्या भावना व्यक्त करताना हळहळ व्यक्त केली. डॉ. मुन्शी यांच्या जाण्याने केवळ मित्र परिवाराचेच नाही तर समाजाचे देखील एकप्रकारे हानी झाल्याची भावना त्यांच्या मित्रांनी व्यक्त केली.