Solapur News : सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मुद्यावरुन शेखर बंगाळे (Shekhar Bangale) यांनी भंडारा टाकला होता. यावेळी आंदोलक शेखर बंगाळे यांना भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे (Narendra Kale) यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर धनगर समाजातर्फे संताप व्यक्त होऊ लागला. तर धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी या मारहाणी प्रकरणी माफी मागितली आहे.


नेमकं काय म्हणाले नरेंद्र काळे 


आंदोलक शेखर बंगाळे यांनी काहीही करणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर मी स्वतः त्याला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याजवळ नेले होते. पण त्याने अचानकपणे खिशातून काय काढले हे लक्षात आले नाही. त्यावेळेस झटापटीत माझ्याकडून अनावधानाने कृत्य झाले. यामुळं समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. पण कोणीही याचे भांडवल करु नये असे नरेंद्र काळे म्हणाले. मी धनगर चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे, अशी प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली.


नेमकं प्रकरण काय?


सोलापुरात धनगर समाज आरक्षण कृती समितीने (Dhangar Reservation Action Committee) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न कित्येक वर्ष प्रलंबीत असल्यानं धनगर आरक्षण कृती समितीच्या सदस्यांनी भंडारा उधळला आहे. सोलापूर (Solapur News) शासकीय विश्रामगृहात घटना घडली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवसीय दौऱ्यासाठी सोलापुरात आले होते. काल त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस होता. ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. अशातच अनेक लोक त्यांच्या भेटीसाठी तिथे येत होते, आपले प्रश्न मांडत होते. ते लोकांची निवेदनं स्विकारत होते. अशातच धनगर आरक्षण कृती समितीच्या काही सदस्यांनी कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या धनगर आरक्षणासंदर्भातील निवेदन त्यांना देण्याची विनंती केली. हे निवेदन राधाकृष्ण विखे पाटील स्विकारत असताना कार्यकर्त्यांनी अचानक खिशातून भंडारा काढला आणि तो राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर उधळण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात विखे पाटलांच्या सुरक्षारक्षकांनी आणि उपस्थित पोलिसांनी धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांना अडवलं आणि बाहेर आणलं. कार्यकर्त्यांना थांबवले, काही प्रमाणात मारहाणही करण्यात आली होती.


महत्त्वाच्या बातम्या:


मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षणाची मागणी; आक्रमक झालेल्या कृती समितीनं विखे पाटलांवर भंडारा उधळला