Solapur Barshi News : दरवर्षी देशात, राज्यात मोठ्या प्रमाणात लग्न (Marriage) होतात. बऱ्याच ठिकाणी लग्नात मुलींच्या घरच्यांकडून हुंडा घेण्याची पद्धत आहे. मुलाकडे जर मोठी संपत्ती, जमीन जुमला, गाडी असेल तर हुंड्याची रक्कम मोठी असते. मात्र, असेही काहीजण आहेत की, जे लग्नात हुंडा घेत नाहीत. मात्र, सासरचे लोक जावयाची हौस करण्यासाठी काही ना काही करतातच. अशीच एक घटना बार्शी (Barshi) तालुक्यातील बाभुळगावमध्ये घडली आहे. लग्नात हुंडा घेतला नाही म्हणून सासऱ्याने जावयाला तब्बल 20 लाख रुपयांची चारचाकी गाडी गिफ्ट (Four wheeler gift) म्हणून दिली आहे. या लग्नाबाबत सर्वत्र सासऱ्याची हौस आणि जावयाची मौज असं म्हटलं जात आहे. 


सासऱ्याची हौस आणि जावयाची मौज 


बाभुळगावमधील अक्षय बाबर (Akshay Babar) यांना त्यांच्या सासऱ्याने लग्नात स्कॉर्पियो-एन (Scorpio-N) ही चारचाकी गाडी भेट दिली आहे. जावयाने हुंडा घेण्यास नकार दिल्यानं सासऱ्याने जावयाची आणि मुलीची हौस व्हावी, म्हणून 20 लाख रुपयांची गाडी भेट दिली आहे. या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या लग्नाबाबत सासऱ्याची हौस आणि जावयाची मौज असं म्हटलं जात आहे. अक्षय बाबर यांनी लग्नात कोणत्याही प्रकारचा हुंडा किंवा दागिने स्वीकारण्यास नकार दिला होता. यामुळं सासऱ्याने खुष होऊन ही चारचाकी भेट दिली आहे. हे लग्न अत्यंत साधेपणाने पार पाडण्यात आले.


अक्षय बाबर हे पेशानं शेतकरी


आमच्या कुटुंबियांनी मुलगी आणि नारळ घेण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल खुष होऊन मला मुलीच्या घरच्यांनी चारचाकी भेट दिल्याचे अक्षय म्हणाले. मी एका शेतकरी कुटुंबातून येतो. मी सध्या  शेती करत आहेत. 15 एकर बागायती शेती असल्याची माहिती बाबर यांनी दिली. दरम्यान, अक्षय बाबर यांनी हुंडा न घेतल्याच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


ताटाला टेकण लावायची नेमकी प्रथा काय?


लग्न सोहळा पार पडल्यानंतर नवरा नवरीला जेवायचा घेऊन जातात. यावेळी नवदेव जेवताना सासऱ्याच्या लोकांनी त्याच्या ताटाच्या टेकणाला काहीतरी लावण्याची प्रथा आहे. मग कोणी पैसे लावते, कोणी सोनं, नाणं, अंगठी लावते किंवा कोणी टेकण म्हणून दुचाकी देते. पण अक्षय बाबर यांच्या ताटाला टेकण म्हणून सासऱ्याने चक्क चारचाकी गाडी लावली आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Telangana : वधू म्हणाली, नवरदेवाची ऐपत नाही, अपेक्षित हुंडा मिळाला नाही म्हणून मोडलं लग्न!