Solapur APMC Election Result: सोलापूर APMC निवडणुकीच्या 4 जागांचा निकाल जाहीर, भाजप विरुद्ध भाजप आमदारांमध्येच चुरस, कोण विजयी?
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध भाजपचेच आमदार सुभाष देशमुख यांच्या दोन्ही पॅनलमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली

Solapur: सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची आज मतमोजणी पार पडत असून पहिल्या चार जागांचे निकाल जाहीर झाले आहेत . यात भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाने चार पैकी तीन जागांवर विजय मिळवला आहे .तर प्रतिस्पर्धी भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या वाट्याला ग्रामपंचायत मतदार गटात केवळ एक जागा मिळवता आली .(Solapur APMC Election Result)
यंदाच्या निवडणुकीत एकूण 70 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत .या निवडणुकीत एकूण 18 जागांसाठी मतदान घेण्यात आले असून चार जागांचे निकाल जाहीर झालेत अजून 14 जागांचे निकाल घेणे बाकी आहे .
भाजपच्याच आमदारांमध्ये चुरशीची लढत
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध भाजपचेच आमदार सुभाष देशमुख यांच्या दोन्ही पॅनलमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली . दिग्गज नेत्यांसह अनेक नवखे उमेदवारही यंदा निवडणुकीच्या रिंगणात होते .सुभाष देशमुख गटाचे उमेदवार मनीष देशमुख रामपा चिवड शेट्टी आणि अतुल गायकवाड यांनी जोरदार मुसंडी मारत विजय संपादन केलाय तर कल्याण शेट्टी गटाचे उमेदवार सुनील कळके यांनी एकमेव जागेवर विजय मिळवला आहे .शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि कल्याण शेट्टी गटाचे उमेदवार गणेश वानकर यांना या निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागलाय .
सोलापूर कृषी उत्पन्न बाजारसमिती निवडणूक
राज्यात नवी मुंबई, पुणे नागपूर, नाशिकसह सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजारसमितीचा मोठा लौकिक आहे. विशेषत: सोलापूरची बाजारपेठ कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. सोलापूर बाजारसमितीच्या संचालक मंडळाची मुदत गेल्या दीड वर्षांपूर्वीच संपली होती. भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आग्रहामुळे बाजारसमितीच्या संचालक मंडळाला या ना त्या कारणाने वर्षभर मुदतवाढ मिळाली होती. दरम्यान, अलिकडेच उच्च न्यायालयाने सोलापूर कृषी उत्पन्न बाजारसमितीची निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार,25 मार्च ते 28 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून 27 एप्रिल रोजी मतदान पार पडले. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 28 एप्रिलला मतमोजणी पार पडत आहे.
आणखी तीन जागांचे निकाल जाहीर
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आणखी तीन जागांचे निकाल हाती आले आहेत. हमाल तोलार गटातून भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलचे उमेदवार गफार चांदा यांनी विजय मिळवला आहे. यानंतर विद्यमान संचालक आणि अपक्ष उमेदवार भीमा सीताफळे यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
व्यापारी गटातून मुस्ताक चौधरी आणि वैभव बरबडे यांनी बाजी मारली आहे. विविध व्यापारी संघटनांनी एकत्र येत चौधरी आणि बरबडे यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्या विरोधात तीन अपक्ष उमेदवारांनी आव्हान दिलं होतं, मात्र संघटनांच्या पाठिंब्यामुळे चौधरी आणि बरबडे यांचा एकतर्फी विजय झाला आहे.आतापर्यंत एकूण 18 जागांपैकी 7 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. आता विविध कार्यकारी सोसायटीच्या 11 जागांची मतमोजणी सुरू आहे. या निर्णायक मतांवरच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता कोणाकडे जाणार, हे ठरणार आहे. त्यामुळे पुढील निकालांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा:
























