Boat capsizes in Ujjani Dam : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील उजनी धरणात (Ujjani Dam) एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील परिसरात उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बोट बुडाल्याची घटना काल (21 मे) घडली आहे. यामध्ये सहा प्रवासी बुडाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आज सकाळी तब्बल  17 तासानंतर उजनी जलाशयात बुडालेली बोट 35 फूट पाण्यात तळाशी सापडली आहे. मात्र बुडालेले प्रवासी शोधण्यात अद्याप NDRF च्या जवानांना य़श आलं नाही. दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली? उजनी अपघाताची आत्तापर्यंतची ए टू झेड कहाणी पाहुयात.


नेमकी घटना घडली कशी?


काल (21 मे) सायंकाळी डोंगरे व जाधव कुटुंब इंदापूर तालुक्यातील अजोती येथे पाहुण्याच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाला निघाले होते. हे सर्व प्रवासी कुगावकडून कळाशीच्या दिशेने जाणाऱ्या बोटेत होते. बोट मध्यभागी नदीपात्रात आल्यानंतर अचानक हलका पाऊस आणि जोरदार वारा सुटला. त्यामुळं रौद्ररुप धारण केलेल्या लाटांचे पाणी बोटीत शिरले आणि बोट जागेवर फिरली. बोटीत पाणी शिरल्यानं दोन चिमुकले सोडून सर्वजण बोटीतून पाण्यात उतरले. त्यावेळी त्या सर्वांनी बोटीला सावरण्याचा प्रयत्न केला. हा जीवन मरण्याचा संघर्ष जवळपास 10 ते 15 मिनिटे सुरु होता. मात्र, जोराच्या वादळामुळं त्यांची झूंज अपयशी ठरली. अखेर पाणी शिरलेली बोट पात्रात बुडाली.


पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे पोहत पोहत पोहोचले नदीच्या काठावर


विशेष म्हणजे या बोटीतून ग्रामीण पोलिसांच्या जिल्हा विशेष शाखेतील पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हे देखील प्रवास करत होते.  बोट पलटी झाल्यानंतर ते पोहत-पोहोत कळाशी गावच्या काठावर पोहोचले आहेत. राहुल डोंगरे हे काठावर पोहोचल्यांतर या घटनेचा उलगडा झाला आहे. 


NDRF च्या टीमकडून उजनी जलाशयात शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरु


दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच NDRF च्या टीमकडून उजनी जलाशयात शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आली होती. अद्यापही शोध मोहिम सुरुच आहे. बोट जरी सापडली असली तरी अद्यापही प्रवाशी बेपत्ताच आहेत. NDRF कडून प्रवाशी शोधण्याचं काम सुरु आहे. 


बुडालेल्या प्रवाशांची नावे


गोकूळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल गोकूळ जाधव (वय 25), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय 3, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग अवघडे (वय 35) व गौरव डोंगरे (वय 16). हे सर्व प्रवाशी बुडाले आहे. अजून यामधील कोणात्याही प्रवाशाचा शोध लागला नाही. जलाशयात बुडालेले सर्व 6 प्रवासी करमाळा तालुक्यातील आहेत. दरम्यान, बुडालेल्या प्रवाशांमध्ये आदिनाथ साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचा मुलगा गौरव डोंगरे याचाही समावेश आहे. 
तसेच कुगावं येथील रहिवासी असलेला बोट चालक पाण्यात बेपत्ता आहेत .


खासदार रणजितसिंह निंबाळकर घटनास्थळी दाखल


दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे घटनास्थळी दाखल झाले आहे. ते देखील NDRF च्या टीमसोबत जलाशयात उतरले आहेत. NDRF च्या टीमकडून उजनी जलाशयात शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे. 


महत्वाच्या बातम्या:


उजनी धरणात बोट पलटली, 6 जण बुडाले, PSI पोहत-पोहत काठावर आले; रात्रीच्या अंधारात शोध सुरू