सोलापूर: राज्यातील सत्ताधारी आघाडी असलेल्या महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना पक्षाचे सोलापूरचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे (Manish Kalje) यांच्याविरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा (Solapur Crime) दाखल करण्यात आला आहे. त्यांनी एका ठेकेदाराला एका प्रकल्पासाठी 15 टक्के कमिशन दे नाहीतर निविदा मागे घे,असे धमकावत मारहाण केल्याचा आरोप आहे. मनीष काळजे यांनी या ठेकेदाराकडून 11 लाख रुपये मागितल्याचे समजते. सत्ताधारी गटातील शिंदे गटाचा (Shinde Camp) पदाधिकारी असलेल्या मनीष काळजे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 


प्राथमिक माहितीनुसार, ठेकेदार आकाश उत्तम कानडे याने सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात मनीष काळजे याच्याविरोधात फिर्याद दिली होती. सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील ड्रेनेज कामासाठी 76 लाखांची वर्क ऑर्डर निघाली होती. त्यासाठी आकाश उत्तम कानडे यांनी निविदा भरली होती. मात्र, काळजे यांनी 76 लाखांवर 15 टक्क्यांच्या हिशेबाप्रमाणे 11 लाख रुपयांचं कमिशन देण्याची मागणी आकाश कानडे यांच्याकडे केली. आकाश उत्तम कानडे यांनी नकार दिल्याने काळजे यांनी  दमदाटी, शिवीगाळ आणि अधिकाऱ्यांना सांगून अपात्र ठरविण्याची धमकी मनीष काळजे यांनी दिल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. 


फिर्यादी 2 जुलैला दुपारी बाराच्या सुमारास महापालिकेचे कनिष्ठ अभियंता दिपक कुंभार यांच्यासमवेत सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांच्या कार्यालयात निविदेच्या चौकशीसाठी गेले होते. तेव्हा काहीवेळाने मनीष काळजे आणि त्यांचे चालक तेथे आले. त्याने राग मनात धरून दोन्ही हाताने तोंडावर चापटी मारल्याचा आरोप आकाश कानडे यांनी केला. दरम्यान या प्रकरणी सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 308 (3), 115 (2), 352, 351 (2), 3 (5)  अन्वये मनीष काळजे यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


फिरण्यासाठी चारचाकी घेतली, पण पैसेच दिले नाहीत


काही दिवसांपूर्वी मनीष काळजे यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दत्तात्रय मुनगा पाटील यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी मनिष काळजे यांनी चार चाकी वाहनाचा सौदा केला होता. यावेळी एक लाख रुपये ॲडव्हान्स देऊन काळजे यांनी वाहन नेले होते. मात्र, उर्वरित तीन लाख रुपये अद्याप मिळाले नसल्याने आपली फसवणूक झाल्याचा आरोप करत दत्तात्रय पाटील यांनी पोलिसांत धाव घेतली होती. त्यामुळे शिवेसना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्यासह आकाश मुदगल या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


आणखी वाचा


फिरण्यासाठी चारचाकी घेतली, पण पैसेच दिले नाही; शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल