सोलापूर : मंगळवेढा येथे सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचे जुने सहकारी आणि मित्र शिवाजीराव काळुंगे यांच्या पंचाहत्तरीचा सोहळा शुक्रवार 19 जानेवारी रोजी पार पडला . यावेळी शरद पवारही (Sharad Pawar) उपस्थित होते. सुरुवातीला सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मित्राची फिरकी घेताना काळुंगे यांच्या पत्नीकडे पाहत तुमचा प्रेमविवाह झाला का असा सवाल केला . त्यावर शरद पवार यांनी देखील आज सुशीलकुमार शिंदे यांची फिरकी घेतली. शिंदेंना त्यांच्या प्रेमविवावाहाची काळजी का असा सवाल शरद पवारांनी विचारला.
शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे दोन्ही मोठे नेते दोन वेगळ्या पक्षात असले तरीही त्यांच्या मागील 40 वर्षांपासून गुरु शिष्याचे नाते आहे, हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यांच्या पक्षीय धोरणामुळे त्यांच्यात अनेकवेळा कटू प्रसंग देखील आले. पण वयाच्या 80 व्या वर्षी देखील देखील हे नेते तेवढेच मोकळेपणाने वावरतात . राजकारणात एकमेकांची फिरकी घ्यायचे प्रसंग अनेकवेळा येतात . अशा गंमतीजंमतीमुळे राजकारणातील वातावरण देखील हलके फुलके होते. अशीच एक फिरकी शरद पवार यांनी घेतली.
नेमंक काय घडलं?
सोलापुरातील मंगळवेढा येथे शुक्रवार 19 जानेवारी रोजी शिवाजीराव काळुंगे यांच्या पंचाहत्तरीचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात सुरुवातीला सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मित्राची फिरकी घेताना काळुंगे यांच्या पत्नीकडे पाहत तुमचा प्रेमविवाह झाला का असा सवाल केला . यानंतर त्यांनी नाही असे सांगितल्यावर काळुंगे यांची कन्या डॉ राजलक्ष्मी गायकवाड यांनी प्रेम विवाह झाल्याचे सांगितले. यानंतर शिंदे यांनी फिरकी घेत तुम्ही कितीही लपवले तरी तुमच्या मुलींनी गुपित फोडले असे सांगितल्यावर उपस्थितीत हशा पिकला.
शरद पवारांनी घेतली सुशीलकुमार शिंदेंची फिरकी
यानंतर फिरकी घेण्याची वेळ थेट शरद पवार यांची होती. त्यांनी भाषणाला सुरुवात करतानाच शिंदे यांना त्यांच्या प्रेमविवाहाची चिंता का वाटली ते मला काही कळेना, असं म्हणत शिंदे यांनीही प्रेमविवाह केल्याचं शरद पवारांनी सांगितलं. शिंदे यांचा प्रेमविवाह झाला तेव्हा मी महाराष्ट्राच्या विधानसभेत होतो आणि ते पोलीस खात्यात होते.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जागा आहेत, तुम्हाला संधी नक्की मिळेल. तुम्ही नोकरी सोडा असा आग्रह करीत असल्याचे पवार यांनी सांगितलं . त्यावेळी शिंदे सांगायचे की, माझी कष्ट करायची तयारी आहे पण जरा घरचे समाधन करण्यासाठी नोकरी करावी लागेल. त्यामुळे प्रेमविवाह केल्यानंतर घरची समाधानाची काळजी घ्यावी लागते अशी फिरकी शरद पवारांनी घेतली. तुम्ही आता एकदा प्रेमविवाह केलाय त्यामुळे तुमची त्यातून सुटका नाही, पण थोडे धाडस करा आणि समाजकारण आणि राजकारणात येण्याचा सल्ला शरद पवारांनी सुशीलकुमार शिंदे यांना दिला होता.