सोलापूर : धाराशिव,सांगोला पंढरपूरसह ५ साखर कारखाने चालवणारा ३० वर्षाचा अभिजीत पाटील नावाचा तरुण सोलापूर (Solapur)जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात महत्वाच्या स्थानावर पोहोचला आहे. खरे तर राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त असणाऱ्या अभिजित पाटील यांनी गेली सहा ते सात वर्षे खासगी कारखानदारीत आपला दबदबा निर्माण केला. मूळचा पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील देगाव येथे असणाऱ्या या पाटलांचे घराणे अफझलखानाच्या हल्ल्यात विठ्ठल मूर्तीचे संरक्षण करणारे घराणे म्हणून ओळख आहे. मात्र, गेल्या 10 दिवसांत जिल्ह्यातील राजकारणात घडलेल्या घडामोडींमुळे अभिजीत पाटलांचा प्रवास नागमोडी राहिल्याचे दिसून येते आहे. 26 एप्रिल ते 5 मे या कालावधीत येथील सगळंच चित्र बदलून गेल्याने वेगळाच पिच्चर लागल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. कारण, आता पवारांचा (Sharad Pawar) हा शिलेदार फडणवीसांच्या सभेसाठी पुढाकार घेत आहे.
सोलापूर जिल्ह्यात अनेक वर्षे बंद असणारा सांगोल्याचा शेतकरी सहकारी साखर कारखाना चालवण्यास घेऊन पुन्हा यशस्वी रीतीने सुरु केल्यावर अभिजीत पाटील पहिल्यांदा चर्चेत आले. त्यानंतर पंढरपूर तालुक्याचे सत्ताकारण ठरविणारा आणि सलग 3 वर्षे आर्थिक अडचणीच्या बंद असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवत तरुणांच्या मदतीने सत्ताधारी भालके गटाला पराभूत करत कारखाना जिंकला. त्यानंतर पाहिल्यावर्षी साडे सात लाख टन गाळप केल्यावर शरद पवार यांनी राष्ट्रवादीत अभिजित यांचा प्रवेश करून घेतला.
राष्ट्रवादी फुटल्यावरही अभिजीत पाटील यांनी शरद पवार यांना साथ दिली आणि सोलापूर जिल्ह्यात पवार यांचा सर्वात जवळचा आणि लोकप्रिय तरुण राजकारणी म्हणून त्यांची ओळख तयार झाली. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीत अभिजीत पाटील हे शरद पवार यांच्यासोबत असायचे. चालू वर्षी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने विक्रमी 10 लाख 81 हजार टन उसाचे गाळप करीत तीन हजाराचा भाव दिल्याने सोलापुरातील इतर साखर कारखान्यांना त्याच पद्धतीने भाव द्यावा लागला. याच काळात 2021 पासून विठ्ठल कारखान्यावर असणाऱ्या 442 कोटी कर्जाचा विषय कोर्टात सुरु झाला होता. पूर्वीच्या सत्ताधाऱ्याने केलेले कर्ज फेडण्याची जबाबदारी पाटील यांच्यावर आली आणि त्यांनी जवळपास 37 कोटी कर्जाची फेडही केली. मात्र, शिखर बँकेने वसुलीसाठी न्यायालयात जोर लावल्याने अभिजीत पाटील यांनी DRT न्यायालयात मिळविलेली स्थगिती 25 एप्रिल रोजी संपली.
26 एप्रिल रोजी शरद पवार लोकसभा प्रचारासाठी करमाळा, सांगोला आणि पंढरपूर येथे आले होते. याच दिवशी अभिजित पाटील पवार यांच्या करमाळा येथील सभेत असताना शिखर बँकेने सकाळी अकरा वाजता कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. सभा सोडून पाटील हे कारखान्यावर पोहोचले. मात्र, बँकेचे अधिकारी कारवाई करून निघून गेले. याच दिवशी रात्री शरद पवार पंढरपूर येथे मुक्कामाला होते. मात्र, जप्ती प्रकरणी शरद पवार यांच्याकडून कोणतीही मदत होऊ शकली नाही. याच दिवशी त्यांनी माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुरु केलेला शरद पवार गट आणि काँग्रेसचा प्रचार पूर्ण बंद केला आणि प्रचार यंत्रणा थांबवल्या.
26 एप्रिल रोजी कारवाईला सुरुवात
26 ते 28 एप्रिल दरम्यान अभिजित पाटील यांनी सर्वबाजूने प्रयत्न केल्यावरही न्यायालयात किमान 25 टक्के म्हणजे 100 कोटी रक्कम भरल्याशिवाय जप्तीची कारवाई मागे घेतली जाणार नव्हती. यानंतर कारखान्याचे 30 हजार सभासद, कामगार आणि संचालक मंडळाशी चर्चेच्या फेऱ्या सुरु झाल्यावर आधी शेतकऱ्यांचा हा राजवाडा वाचवावा अशी भूमिका सर्व शेतकरी सभासद आणि सहकाऱ्यांनी घेतली. २९ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता अभिजित पाटील यांनी सोलापूर येथे हॉटेल बालाजी सरोवर येथे जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांनी मदतीची तयारी दाखवली आणि दिलासा देण्याचा शब्द दिल्यावर तातडीने पाटील यांनी शेतकरी, कामगार आणि सर्व सहकाऱ्यांची बैठक बोलावली. 30 एप्रिल रोजी सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून भाजपचा प्रचार करण्याची भूमिका घेण्यात आली. तर, 1 मे दिवशी सायंकाळी कारखान्यावर मोठा मेळावा घेत येथे माढा लोकसभा उमेदवार रणजित निंबाळकर आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत भाजपाला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर करण्यात आली.
5 मे रोजी फडणवीसांची सभा
3 मे रोजी फडणवीस यांनी शब्द दिल्याप्रमाणे सकाळी आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीची कारवाई बँकेने मागे घेतली. 5 मे रोजी अभिजित पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना कारखान्यावर निमंत्रण दिले आहे. 5 मे रोजी फडणवीस दुपारी 1 वाजता विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर अभिजीत पाटील यांनी बोलावलेल्या सभेस हजेरी लावणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अभिजीत पाटील यांना मदत करत माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी मोठी खेळी यशस्वी केली. याचा थेट फटका राष्ट्रवादीचे माढा लोकसभेतील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूरचे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना बसणार असल्याचे दिसून येते.