Abhijeet Patil : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय अभिजित पाटील (Abhijeet Patil) यांना शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. 442 कोटीच्या कर्जापोटी शिखर बँकेने केलेली जप्तीची कारवाई मागे घेतली आहे. थोड्याच वेळात कारखाना साखर गोडावूनला लावलेले सिल निघणार आहे. कारवाईची जप्ती झाल्यानं पाटील यांनी फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर घडामोडींना वेग आला. 


 माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात अभिजीत पाटलांचा भाजपला पाठिंबा


राष्ट्रवादीचे अभिजित पाटील यांच्या कारखान्यावर जप्तीची कारवाई झाल्यावर अभिजीत पाटील यांनी फडणवीस यांची भेट घेत मदतीची मागणी केली होती. फडणवीस यांनी यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याने दोन दिवसापूर्वी अभिजित पाटील यांनी माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवारांना पाठिंबा देत फडणवीस यांना निमंत्रण दिले होते. आता कारखान्याची जप्तीची कारवाई मागे घेण्यात आली आहे. 5 मे रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता अभिजित पाटील यांनी मेळाव्याचे आयोजन केले आहे. दरम्यान, प्रशासनाने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला लावलेलं सील काढण्यास सुरुवात केली आहे.


7 मे ला लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा


आत्तापर्यंत देशात दोन टप्प्यातील निवडणूक पार पडली आहे. अद्याप पाच टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे बाकी आहे. निवडणुकीचा तिसरा टप्प्या येत्या 7 मे ला होणार आहे. या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक राजकीय नेते गळाला लावण्याचे प्रयत्न विविध राजकीय पक्षाकडून केले जात आहेत. शरद पवार यांचे पंढरपुरातील सहकारी आणि सहा कारखान्याचे मालक अभिजीत पाटील यांना गळाला लावण्यात भाजप यशस्वी झाली आहे. अभिजीत पाटील यांनी भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.


अभिजीत पाटलांचा भाजप उमेदवारांना पाठिंबा


काही दिवसापूर्वीच अभिजीत पाटील हे सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करत होते. मात्र, कारखान्यावर जप्तीची नोटीस आल्यामुळं त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागितली होती. फडणवीसांनी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच भाजपला पाठिंबा देण्याची विनंती देखील अभिजीत पाटील यांना केली होती. त्याप्रमाणे अभिजीत पाटील यांनी अखेर भाजप उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, पाटील यांच्या पाठिंब्यामुळं भाजपला माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात चांगल पाठबळ मिळालं आहे.   


महत्वाच्या बातम्या:


माढ्यात नवा ट्विस्ट! अभिजित पाटील यांनी लोकसभेला भाजपाला पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीला धक्का