सोलापूर : सोलापुरात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या गाडीवर अज्ञांतांकडून चप्पलफेक करण्यात आली आहे. सोलापुरातील (Solapur) बाळे येथे एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी संजय राऊत आले होते. त्यावेळी परत जात असताना राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक करण्यात आली. राऊतांच्या गाडीवर चप्पलने भरलेली पिशवी फेकण्यात आली होती. दरम्यान यावेळी या प्रकारानंतर नारायण राणेंच्या समर्थनार्थ घोषणा देऊन कार्यकर्ते पसार झालेत. सध्या या कार्यकर्त्यांचा शोध पोलीस आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते घेत आहे.
नियोजित कार्यक्रमांसाठी संजय राऊत हे रविवार 10 डिसेंबर रोजी दिवसभर सोलापूर दौऱ्यावर होते. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गाजवळ असेलल्या बाळे या गावात संजय राऊत एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी पुन्हा माघारी फिरत असताना आणि सोलापूर शहराच्या दिशेने जात असताना राऊतांच्या गाडीवर चप्पलेची पिशवी फेकण्यात आली. पुलावरुन एका अज्ञात कार्यकर्त्याने ही पिशवी राऊतांच्या गाडीवर फेकली.
कार्यकर्त्यांकडून नारायण राणेंच्या समर्थनार्थ घोषणा
यावेळी हे कार्यकर्ते नारायण राणेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत असल्याचं पाहायला मिळालं. पण हे कार्यकर्ते चप्पलेची पिशवी फेकून तात्काळ त्या जागेवरुन पसार झाले. सध्या पोलीस आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे या कार्यकर्त्यांचा शोध घेत आहे. त्यामुळे हे कार्यकर्ते नेमकं कोण होते, हे अद्याप समजू शकलेलं नाही. संजय राऊतांकडून सातत्याने नारायण राणे आणि राणे कुटुंबावर टीका केली जाते. दरम्यान राणे कुटुंबिय देखील राऊतांवर टीकेची झोड उठवत असतात. त्यामुळे त्यातून हे कृत्य घडल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे.
हा कार्यक्रम औपचारिकरित्या राऊत गेल्यानंतरही सुरु होता. त्यामुळे त्या ठिकाणी ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी तात्काळ घटनास्थळावरुन चप्पलांची पिशवी बाजूला केली. ज्यांच्या हॉटेलचं उद्घाटन होतं त्या भवर कुटुंबियांनी सर्व शिवसैनिकांना शांत केलं. म्हणून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा राडा किंवा गोंधळ झाला नाही. पण कार्यक्रमात गोंधळ न होऊ देण्यासाठी जरी शिवसैनिकांनी शांततेचा पवित्रा घेतला असेल तरीही या शिवसैनिक मात्र ज्यांनी चप्पलफेक केली त्यांचा शोध घेत आहेत. तसेच यावर आता राजकीय वर्तुळात आणि नारायण राणे काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
राऊतांच्या गाडीवर म्हणून चप्पलफेक झाली
संजय राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक करणाऱ्या कार्यकर्त्याची पहिली प्रतिक्रिया समोर आलीये. संजय राऊत हे सातत्याने नारायण राणे, पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वरती टीका करत असतात. त्याचप्रमाणे त्यांनी मराठा मूक मोर्चाला देखील हिणवले. तो राग माझ्या मनात होता, त्यामुळेच मी संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पलफेक केल्याची प्रतिक्रिया या कार्यकर्त्याने दिली आहे. दरम्यान हा सागर शिंदे स्वतः राणे समर्थक आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक असल्याचा देखील दावा करत आहे. मला कार्यक्रम स्थळी पोहोचायला उशीर झाला, पुलावरून मला केवळ चप्पल मिळाल्या त्यामुळे मी चप्पल फेकली. तिथे जर दगड असते तर मी संजय राऊत यांच्यावर डोक्यात दगड घातले असते. माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी बेहत्तर, पण मी माझ्या मनातील राग व्यक्त केला, अशी प्रतिक्रिया सागर शिंदेनी दिली.