पंढरपूर : आपल्या मित्राला मानहानी टाळून आपली प्रतिमा राखायची असेल तर त्याने झाकली मूठ ठेवून 31 डिसेंबरपूर्वी राजीनामा द्यावा. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर शरणागती पत्करावी असा मित्रत्वाचा सल्ला ठाकरे गटाचे (Thacekray Group) परभणीचे (Parbhani) खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) दिलाय. नवीन वर्षात हे सरकार पडणार असे दावे सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केलाय.
आमदार अपात्रतेवर सुनावणीवर निकाल देण्यासाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलीये. त्यामुळे संक्रांतीआधीच महाराष्ट्राच्या राजकारणाचा महत्त्वपूर्ण निकाल लागण्याची शक्यता आहे. त्याच्याच आधी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं मत खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केलं आहे.
संजय जाधव यांनी काय म्हटलं?
सर्वोच्च न्यायालयाने व्हीप हा सुनील प्रभूंचा असल्याचं सांगितल्यानंतर हे लोक म्हणतात आम्हाला व्हीप मिळालाच नाही. जर व्हीप मिळाला नव्हता चक राज्यपालांकडे कसे गेलात, सरकार अल्पमतात आल्याचं सांगायला गेला होता का, असा सवाल यावेळी खासदार संजय जाधव यांनी उपस्थित केलाय. भाजपने शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. मग लोकसभेनंतर त्यांच्या दृष्टीने एकनाथ शिंदेंना संपवणे किती जड आहे, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला आहे. त्यामुळे अजूनही उद्धव ठाकरे यांच्यापुढे शरणागती पत्कारावी ते माफ करु शकतील असा सल्ला देखील संजय जाधव यांनी दिलाय.
शरण से मरण टल सकता हे असं रामायणातील उदाहरण देत जाधव यांनी शिंदे यांना माफी मागण्याचा देखील सल्ला दिलाय.
माणसं फोडायची कामं ते करतायत - संजय जाधव
सरकारमध्ये असलेल्या लोकांकडे लोकं नाहीत, फक्त भरपूर चिल्लर आहेत आणि याचा वापर ते सातत्याने माणसं फोडण्यासाठी करतायत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सोबत असणाऱ्या आमदारांना येत्या निवडणुकांमध्ये पाडण्यासाठी व्यूह रचना आखली जातेय. पण जनता समर्थ असून त्यांच्यावर कोणत्याही ताकदीचा परिणाम होणार नाही, असं देखील त्यांनी म्हटलं.
आरक्षण कसे देणार त्यांनाच माहित - बंडू जाधव
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री बोलत असले तरीही भाजपचे लोक नेमकं उलटं बोलतायत, त्यामुळे ते आरक्षण कसे देणार त्यांनाचा माहिती. पन्नास टक्क्यांच्यावर आरक्षण द्यायचे असेल तर त्याचा निर्णय केंद्राला घ्यावा लागतो . केंद्र एकट्या महाराष्ट्रासाठी असा निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे केंद्राला खाऊ ही द्यायचे नाही आणि जगू देखील द्यायचे नाही, अशी टीका त्यांनी केलीये. यात महाराष्ट्रात सुरुवातीला हिंदू मुस्लिम मध्ये वाद घडवण्याचा प्रयत्न केला. पण यामध्ये यश न आल्याने आता मराठा आणि ओबीसी वाद घडवून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी संजय जाधवांनी केलाय.