Solapur Onion News : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (onion Farmers) अडचणीत सापडले आहेत. कारण, कांद्याच्या दरात (Onion Price) सातत्यानं घसरण होत आहे. सरकरनं कांद्याच्या निर्यातीवर बंद (Onion Export Ban) घातल्यानंतर कांद्याचे दर घसरले आहेत. या मुद्यावरुन शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, अशातच  सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee of Solapur) पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली आहे. बाजार समितीत सुमारे 1200 ते 1500 गाडी कांद्याची आवक झाली आहे. या वाढलेल्या आवकेमुळं दरात आणखी घसरण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.


शनिवार रविवारी सोलापूर बाजार समिती बंद


सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे 1200 ते 1500 गाडी कांद्याची आवाक झाली आहे. अद्यापही अनेक गाड्या रांगेत थांबून आहेत. त्यामुळं आज सकाळी दहा वाजता सुरु होणारे कांद्याचे लिलाव दुपारी दोन वाजता करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. तर उद्या शनिवारी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीनं घेतला आहे. तर रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्यानं सलग दोन दिवस बाजार समिती बंद राहणार आहे. आधीच निर्यातबंदीमुळं सोलापूरच्या बाजारात कांद्याचे दर निम्म्याहून अधिक घसरले होते. त्यातच वाढलेल्या आवकेमुळं दरात आणखी घसरण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सोलापूर बाजार समितीच्या नियोजनाच्या अभावामुळं शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जातेय. 


कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आंदोलनं सुरु


यंदा राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच उरल्यासुरल्या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यात शेतकऱ्यांनी कसेबसे कांद्याच्या पिकाला जगवलं आहे. मात्र, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतल्याने कांद्याला कमी भाव मिळत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळला. एकीकडे अवकाळी आणि गारपिटीनं बळीराजा होरपळला आहे. शेतकऱ्याला हिवाळी अधिवेशना दरम्यान आर्थिक मदत होईल आणि दिलासा मिळेल अशी आशा होती. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयाने शेतकरी वर्गात पुन्हा नाराजी पसरली आहे. अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आंदोलनं सुरु आहेत. दरम्यान, केंद्र सरकार लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेईल,असे आश्वासन मंत्री पियुष गोयल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले आहे. त्यामुळं आता यावर तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


कांदा उत्पादकांसाठी 'केंद्र सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, पियुष गोयल यांचं फडणवीसांना आश्वासन