सोलापूर : मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) सतत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करतांना पाहायला मिळत आहे. अशात आता जरांगे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर देखील निशाणा साधत टीका केली आहे. 'मर्यादी संपल्यावर मराठे करेक्ट कार्यक्रम करतात' असे म्हणत मनोज जरांगेंनी आता थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. जरांगे आज सोलापूर (Solapur) जिल्ह्याचा दौऱ्यावर असून, 'एबीपी माझा'शी बोलतांना त्यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे. 


यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांची भाषा आता एकनाथ शिंदे देखील बोलू लागले आहेत. एकनाथ शिंदे यांचे शब्द ऐकत आम्ही सहा महिने त्यांना वेळ दिला, पण ते देखील आता आम्हाला बोलू लागले आहेत. मर्यादा संपली की मराठे करेक्ट कार्यक्रम करत असतो. नऊ तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत, त्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते घेऊ. समाजाचे म्हणणे आहे की तुम्ही उपोषण करू नका. समाजाच्या विरोधात जाऊन राजकीय अस्तित्व निर्माण करता येणार नाही हे सरकारला लक्षात कसे येत नाही. सहा महिने तुम्ही आमचे फुकटचे घालवले आहात, आता आरक्षण गनिमी काव्याने कसे मिळवू ते तुम्हाला दाखवून देऊ, असेही जरांगे पाटील म्हणाले आहेत. 


माझा राजकीय मार्ग नाही...


पुढे बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, "ज्वलंत मराठा समाजाला अंगावर घेऊन, सरकार निवडणुका घेणार नाही. निवडणुका होणारच नाही, तर मराठा मतदान कोणाच्या बाजूने देणार हा प्रश्नच नाही. सरकारने जाणीवपूर्वक खोटे आरोप सुरु केले असून, कार्यकर्त्यांना गुंतवायला सुरु केलं आहे. सगेसोयऱ्यांच्या संदर्भात अधिसूचना काढली आहे, मात्र त्याची कोणतीही अंमलबजावणी केली जात नाही. दहा टक्के आरक्षण देऊन समाज समाधानी आहे, असे देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. माझा राजकीय मार्ग नाही, पण मराठ्यांचा इतका ज्वलंत प्रश्न असताना सरकार निवडणुका घेणार नाही. शेकडोंची उमेदवारी दाखल करण्यासंदर्भात निर्णय समाजाने घेतला आहे, तो निर्णय समाजाचा आहे. तर, मी समाजाचा मालक नाही समाज माझा मालक असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 


लोकसभेला इतके उमेदवार की, यांचे चिन्हचं दिसणार नाहीत....


यांच्या आजूबाजूला फिरणारे जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर एसआयटी लावायला हवी, पण माझ्यावर लावली आहे. मी पळून जाणारा नाही. फडणवीस साहेब मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत पळणार नाही. बीडमध्ये 3404 फॉर्म भरण्यासाठी तयार झाले, लोकसभेला इतके उमेदवार झाले की यांचे चिन्हचं दिसणार नाहीत. आपली मागणी ओबीसीतून आरक्षण, सगेसोयरे अध्यादेशाची अमलबजावणी अशी आहे. लोकसंख्या जास्त असताना यांनी केवळ दहा टक्के आरक्षण दिलं, त्यात ही सवलत नाही. आम्हाला न्याय मिळत नसेल तर आधी दोन कोटी मराठा घेऊन आलो होतो, आता चार कोटी मराठा घेऊन येईल असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


 फडणवीस साहेब आचारसंहितापूर्वी आरक्षण द्या,अन्यथा मराठा तुमचा सुपडासाफ करतील; जरांगेंचा इशारा