सोलापूर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपुरच्या विठुरायाचा (Pandharpur Vitthal)  आशीर्वाद पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi)  महाराष्ट्रात येणार आहे.  राहुल गांधींच्या पालखी सहभागावरुन महाराष्ट्रात राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी  टीकेची झोड उडवली आहे.  राहुल गांधी यांनी आषाढी वारी (Ashadhi Wari)  पालखी सोहळ्यात कॅट वॉक करायला येऊ नये, अशी खोचक टीका  भाजपचे माढा माजी खासदार रणजीत निंबाळकर (Ranjeet Nimbalkar)   यांनी केली आहे.  


भाजपचे माढा माजी खासदार रणजित निंबाळकर यांनी पालखी सोहळा प्रमुखांची भेट घेऊ मागणी केली  आहे पालखी सोहळा प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद देत ज्या राजकीय नेत्यांना दर्शनासाठी पालखी सोहळ्यात यायची इच्छा असेल त्यांनी रात्री मुक्कामाच्या ठिकाणी येऊन दर्शन घ्यावे अशी भूमिका घेतली आहे . 


राजकीय फायदा घेण्यासाठी वारीत सहभागी होणार, रणजीत निंबाळकरांची टीका


रणजीत निंबाळकर म्हणाले,  राहुल गांधी यांनी आषाढी पालखी सोहळ्यात कॅट वॉक करायला येऊ नये . कोणत्याही राजकीय पक्षाने या भोळ्या भाबड्या वारकरी संप्रदायाचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करू नये. आजवर राहुल गांधी यांना कधी विठ्ठल अथवा पालखी आठवली नाही.  मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा घेण्यासाठी येण्याच्या चर्चा सुरू केल्या आहेत,  त्याचा निषेध आम्ही करतो.


पंतप्रधान मोदींनी  कोट्यवधीचा निधी वारकरी संप्रदायाला दिला : निंबाळकर


तसेच पंतप्रधान मोदी आणि राज्य सरकारने कोट्यवधीचा निधी वारकरी संप्रदायाला दिला आहे. पालखी मार्ग केले तरी याचा राजकीय वापर केला नसल्याचा दावा निंबाळकर यांनी केला आहे . 


राहुल गांधी पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेणार


लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने काँग्रेसच्या झोळीत भरभरून 13  जागांचे दान दिल्यानंतर आता महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असणाऱ्या आषाढी सोहळ्यासाठी लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे 13 किंवा 14 जुलै रोजी पंढरपुरात येऊन विठुरायाचे दर्शन घेणार आहेत . याबाबत काँग्रेसच्या एका जेष्ठ नेत्याने यास दुजोरा दिला असून 17 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा असल्याने त्यापूर्वी 13 किंवा 14 जुलै रोजी राहुल गांधी विठ्ठल मंदिरात येऊन दर्शन घेणार आहेत . त्यापूर्वी पालखी सोहळ्यासोबत चालण्याचा आनंदही त्यांना घ्यायचा असून याबाबत देखील प्रयत्न करण्यास सुरुवात झाली आहे . यावेळी पालखी सोहळे हे माळशिरस तालुक्यात असणार असून यावेळी माळशिरस ते वेळापूर या मार्गावर राहुल गांधी वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे . 


हे ही वाचा :


आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी बुंदीचे 11 लाख लाडू बनवण्यास सुरूवात; गरज पडल्यास आणखी 5 लाख लाडू बनवणार