Pandharpur News : श्रावण आणि गणपती उत्सवाच्या (Ganpati Festival 2022) काळात कमी झालेल्या चिकन, मटण आणि अंड्यांच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. परिणामी मांसाहारी ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागू लागली असून हॉटेल चालकांचीही डोकेदुखी वाढली आहे. खरंतर गणपती पक्ष पंधरवड्यामध्ये यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात कधी दरवाढ झाली नसली तरी चिकनच्या दारात थेट शंभर रुपयाने वाढ झाल्याने विक्रेत्यांनाही रोज ग्राहकांच्या नाराजीला सामोरं जावं लागत आहे. श्रावणात बॉयलर कोंबडीचे दर 160 रुपये किलो होते आता त्या दरात थेट 100 रुपयाने वाढ झाल्याने याचे दर 260 रुपये झाले आहेत.


देशी कोंबडी जी 300 रुपये किलो दराने मिळायची ती आता 400 रुपये किलो झाल्याचे विक्रेते लियाकत भडाळे सांगतात. श्रावणात ज्या अंड्यांचा दर 5 रुपये होता तो आता 7 रुपये झाला असून देशी अंडे 7 रुपयांवरुन 10 रुपये झाले आहे.
 
बोकडाचे मटण श्रावणात 500 रुपये किलो दराने विकले जायचे ते आता 650 रुपये किलोने विकले जाऊ लागले आहे. अचानक हे भाव वाढल्याने ग्राहकांशी विनाकारण वाद होत असल्याचे भडाळे सांगतात. नवरात्रीनंतर हे दर अजून वाढत जाणार असल्याने याचा विक्रीवर परिणाम होणार असल्याची भीती भडाळे यांना वाटत आहे. 


चिकन आणि मटणच्या दरात झालेल्या वाढीमुळे आमच्या अडचणी वाढल्या असल्या तरी आम्हाला खायची आवड असल्याने किलोच्या जागी अर्धाकिलो नेऊन खायची वेळ आता ग्राहकावर आल्याचे नागेश गंगेकर यांनी सांगितले 


'या' कारणांमुळे दर वाढले
वास्तविक यंदा पाऊस देखील चांगला झाल्याने कोंबडीचे खाद्य असलेले मका स्वस्त होईल अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या वर्षी 13 रुपये किलोने मिळणारा मका आता 30 रुपये किलो भावाने देखील मिळत नसल्याचं सादिक बेदरेकर यांनी सांगितले. खरंतर हा महिना चिकनचा भाव वाढणारा नसला तरी आता नवरात्रीनंतर थंडी आणि दिवाळीत तर चिकन आणि अंड्यांचे भाव अजून मोठ्या प्रमाणात वाढत जाईल, अशी भीती बेदरेकर यांनी व्यक्त केली. चिकनचा होलसेल व्यापार करणारे अबू बक्कर मुजावर यांनी या भाववाढीमागे कोंबडीचे खाद्य दर वाढल्यासोबतच डिझेल दरवाढीमुळे वाहतूक महाग होत गेली असल्याचं सांगितलं. यातच आता अनेक मार्गावर नव्याने टोल सुरु झाल्याने चिकनचे भाव वाढत चालल्याचं सांगितलं. 


'ग्राहकांच्या नाराजीला सामोरं जावं लागतं'
एका बाजूला सर्वसामान्य ग्राहकाच्या खिशाला जशी कात्री लागत आहे तशीच अवस्था आता हॉटेल चालकांची झाल्याने त्यांनाही खूप त्रास होऊ लागला आहे.   श्रावणात उतरलेले दर आता वाढल्यामुळे जेवणाचे दर वाढवण्याशिवाय पर्याय नसला. परंतु हे दर वाढवले की ग्राहकांच्या नाराजीला सामोरं जावं लागत असल्याचे धनश्री हॉटेलचे व्यवस्थापक बापू शिंदे यांनी सांगितलं. या हॉटेलला महिन्याला 250 किलो चिकन लागतं. मात्र चिकनचा दर किलोला 100 रुपये वाढल्याने कसा धंदा करायचा असा प्रश्न उभा राहिल्याचं बापू शिंदे यांनी सांगितलं. 


शेतकऱ्यांनीही कोंबड्या आणि बोकडाचे भाव वाढवले
जी अवस्था चिकनची तिच अवस्था मटणाची असल्याने सध्या मांसाहाराचे जेवण देताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे शिंदे सांगतात. खवय्यांना चांगलं खायला द्यायचं आणि दरही वाढवायचे नाहीत याचं गणित अवघड झाले असून आता या किमती वाढत जाणार असल्याने आमच्या अडचणी वाढणार असल्याचं ते म्हणाले. एकंदर एका बाजूला लम्पी आजारामुळे जनावरांनी शेतकऱ्याला अडचणी आणल्याने शेतकऱ्यांकडूनही कोंबड्या आणि बोकडाचे भाव वाढवण्यात आले आहेत. याचा थेट फटका आता मांसाहारी खवय्यांना बसू लागला आहे. त्यामुळे मांसाहारी खायचे असल्यास जादा पैसे मोजायची तयारी ग्राहकांना ठेवावी लागणार आहे.