Maharashtra Agriculture news : शेती करताना शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येतात. ही संकट पार करत काही शेतकरी भरघोस उत्पादन घेताना दिसत आहेत. अशाच एका भरघोस पेरुचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथेची (Success Story) माहिती आज आपण घेणार आहोत. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा तालुक्याती शेटफळ (Shetphal) नोगोबाचे या गावातील शेतकऱ्याने पेरुच्या बागेतून लाखोंचा नफा मिळवला आहे. दत्तात्रय लबडे (Dattatray Labade) असं या शेतकऱ्याचं नाव असून, त्यांचा पेरु थेट केरळच्या बाजारात विक्रीसाठी जात आहे.




दत्तात्रय लबडे हे करमाळा तालुक्यातील शेटफळ नोगोबाचे या गावातील शेतकरी आहेत. अतिशय यशस्वीपणे त्यांनी पेरुची शेती केली आहे. आपल्या दोन एकर पेरुच्या बागेतून त्यांनी गेल्या सहा महिन्यात 14 लाख रुपयांचे उत्पन्न घेतलं आहे. त्यांनी आपल्या शेतात VNR जातीच्या पेरुची लागवड केली आहे. सध्या त्यांचा पेरु केरळच्या बाजारात विक्रीसाठी जात आहे. सांगोल्याच्या व्यापाऱ्यांमार्फत हा पेरु केरळच्या बाजारात पाठवत असल्याची माहिती त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. सध्या केरळच्या बाजारात दत्तात्रय लबडे यांच्या पेरुला प्रति किलोसाठी 50 ते 85 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं हा दर पेरुसाठी चांगला आहे. टातून मोठा नफा मिळत असल्याचे ते म्हणाले.




बाजारापेठेचा अभ्यास आणि पिकाचे नियोजन करणं गरजेचं


आपला शेतमाल चांगल्या दरात विकायचा असेल तर शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा योग्य अभ्यास करायला हवा असे मत शेतकरी दत्तात्रय लबडे यांनी व्यक्त केलं. तसेच आपल्या पिकाचे योग्य नियोजन करणं गरजेचं असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आत्तापर्यंत 24 टन पेरुची विक्री केली आहे. आणखी चार ते पाच टन पेरुचे उत्पादन निघण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत या पेरुच्या बागेसाठी चार लाख रुपयांचा खर्च आला असल्याची माहिती त्यांनी दिली. पेरुबरोबरच माझ्या शेतात केळी, मिरची, कलिंगड ऊस असल्याचे त्यांनी सांगितले.




जागेवर विक्री होत असल्यानं फायदा


व्यापारी जागेवर येऊन पेरुची खरेदी करतात. त्यामुळं आपल्याला येणारा वाहतुकीचा खर्च वाचतो. आपण फक्त शेतातून पेरुची तोडणी करुन द्यायची, त्यानंतर व्यापारी जागेवर येऊन आपला माल घेऊन जातात. तसेच शेतमालाचे पैसे देखील लगेच रोखीन देत असल्याचे दत्तात्रय लबडे म्हणाले. स्थानिक बाजारपेठेत 50 रुपयांच्या आतच पेरुला दर मिळतो. त्यामुळं बाहेरच्या बाजारपेठेत पेरु पाठवणे परवड असल्याचे लबडे यावेळी म्हणाले. प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांचा माल बाहेरच्या बाजारपेठेत पाठवला पाहिजे. जिथे जिथे पेरुला चांगला दर मिळतो, तिथे तिथे आपल्या मालाची विक्री केली पाहिजे असेही ते म्हणाले. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात दोन वर्ष तोटा सहन करावा लागला. योग्य तो दर पेरुला न मिळाल्यानं फटका बसल्याची माहिती दत्तात्रय लबडे यांनी दिली.  




महत्त्वाच्या बातम्या: