सोलापूर: ज्ञानोबा, तुकाराम आदी संतांच्या काळातील म्हणजे 700 वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर (Pandharpur Vitthal Mandir) कसे असेल याची सगळ्यांनाच उत्कंठा लागलेली आहे. आता या 73 कोटींच्या विकास आराखड्याच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या टेंडर प्रक्रियेत मुंबई येथील विठ्ठल मंदिराच्या 73 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचे काम सावनी हेरिटेज अँड कॉन्सर्व्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मिळालं आहे.
पहिल्या टप्प्यातील 26 कोटी रुपयांच्या कामाची सुरुवात कार्तिकी यात्रेनंतर होण्याचे संकेत मंदिर प्रशासनाने दिले आहेत. पुरातत्व विभागाने दिलेल्या निविदेत आता ठेकेदार निश्चित झाल्याने पहिल्या टप्प्यात नेमकी कोणती कामे करायची यासाठी पुरातत्व विभाग, मंदिर समिती आणि ठेकेदार यांची एक बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद घेणार आहेत. त्यानंतर या कामाला सुरुवात होईल असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
मंदिरातील 700 वर्षांपूर्वीचे मूळ रूप पुन्हा दिसणार
नामदेव महाद्वार, दर्शन व्यवस्था, महालक्ष्मी मंदिरावरील स्लॅब, शनी मंदिराजवळील काम आणि मंदिरातील दगडी फ्लोरिंग या कामाला पहिल्या टप्प्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यात लावलेले ग्रॅनाईट आणि मार्बल हटवून पूर्वीच्या मूळ दगडी भिंती पुन्हा भाविकांना पाहता येणार आहेत. याशिवाय संपूर्ण मंदिराचे फ्लोरिंग हे मूळ दगडी केले जाणार आहे.
संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या काळात ज्या पद्धतीने विठ्ठल मंदिराचे स्वरूप होते त्याच पद्धतीने आता भाविकांना पाहायला मिळणार आहे. देशातील पुरातन मंदिराप्रमाणे विठ्ठल मंदिराला 700 वर्षापूर्वीचे रूप मिळणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. राज्य सरकार यासाठी प्रयत्न करत असून यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाने हा विकास आराखडा तयार केल्याचे औसेकर यांनी सांगितले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आराखड्याची विशेष परिश्रम घेतल्याने पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली 73 कोटी 80 लाख रुपयाचा आराखडा मंजूर करण्यात आला होता. तोच आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू करण्यास निधीची तरतूद केल्याने आता विठ्ठलभक्ताना विठ्ठल मंदिराचे 700 वर्षापूर्वीचे रूप येत्या काळात पाहायला मिळणार आहे.
विठुरायाच्या बाबतीत 'नाही घडविला, नाही बैसविला' ही मान्यता वारकरी संप्रदायाची आहे. विठ्ठल मंदिर हे 11 व्या शतकातील असल्याचे अभ्यासक मनात असले तरी त्याहीपूर्वीपासून विठुरायाचे हे मंदिर अस्तित्वात असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे. आता पुन्हा 700 वर्षापूर्वीचे मूळ मंदिराप्रमाणे या मंदिराला रूप देण्यासाठी हा आराखडा पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार बनविण्यात आला आहे. या आराखड्याचे पाच टप्प्यात कामे केली जाणार असून यात मंदिराला मूळ हेमाडपंथी रूप देण्यासाठी जिथे दगडांची झीज झाली आहे अशा ठिकाणी रासायनिक संवर्धन केले जाणार आहे. याशिवाय मंदिराचे आयुष्य वाढविण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात मजबुतीकरणाचे काम केले जाणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात नव्या पद्धतीने बांधलेले नामदेव महाद्वाराच्या आरसीसी काम पाडून तेथे मूळ मंदिराला शोभेल अशा पुरातन दगडात महाद्वार बनविले जाणार आहे. याशिवाय मंदिरावरून जाणारी दर्शन रांग काढून मंदिराशेजारी एक स्काय वॉक बनविला जाणार आहे. अखेरच्या टप्प्यात सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा , वायरिंग आणि वातानुकूलित यंत्रणा याचे काम केले जाणार आहे. एका बाजूला विठ्ठल मंदिराचा विकास आराखडा राबविण्यासाठी राज्य सरकार कामाला लागले असले तरी लाखो विठ्ठल भक्तांची मागणी असलेल्या निवाऱ्यातील दर्शन व्यवस्थेबाबत शासन आणि मंदिर समिती काहीच करीत नसल्याने भाविकांच्या माथी तासंतास मरणप्राय वेदना सोसत दर्शन रांगेतील दर्शन घेणेच नशिबी असणार आहे.
ही बातमी वाचा :