पंढरपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. यामुळे राज्यातील जलाशयात कमालीची वाढ झाली आहे. पंढरपूरमध्येही मुसळधार पाऊस (Pandharpur Rain Update) बरसत असल्याने येथील नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. तर उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपूरमध्ये दुसर्यांदा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रभागा नदी (Chandrabhaga River) इशारा पातळीवर वाहत असल्याने नदीकाठच्या सुमारे चाळीस कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरवर दुसऱ्यांदा पूर परिस्थिती ओढावली आहे. चंद्रभागा नदी इशारा पातळीच्या वर वाहू लागल्याने नदीकाठच्या अंबिकानगर व व्यास नारायण वसाहतीमधील सुमारे 35 ते 40 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
उजनी, वीर धरणातून मोठा विसर्ग
या भागातील घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाल्याने प्रशासनाने रात्रीपासून नागरिकांना हलविण्यास सुरुवात केली असून पाणी पातळी अजूनही वाढली तरी प्रशासन त्या दृष्टीने तयारी करत आहे. सध्या उजनी धरणातून 81 हजार 600 तर वीर धरणातून 43 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सध्या चंद्रभागा नदीत एक लाखापेक्षा जास्त विसर्ग सुरु आहे.
नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
आज दुपारपर्यंत हा विसर्ग एक लाख पन्नास हजार क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने यापूर्वी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. अजूनही पुणे जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने उजनीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उजनीतून अजूनही ज्यादा पाणी सोडले जाऊ शकणार असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. वीर धरणाचे पाणी थोडे कमी केल्याने पंढरपूरला दिलासा मिळाला असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे सातत्याने पूर्ण नियंत्रणासाठी दोन्ही धरणाच्या विसर्गावर लक्ष ठेवून आहेत.
राज्यातील धरणसाठा 75 टक्क्यांच्या पार
दरम्यान, राज्यातील धरणांमधील साठा 75 टक्क्यांच्या पार गेला आहे. यामुळे सर्वसामान्यांसोबतच शेतकरी वर्गाला देखील दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी याचवेळी राज्यात पाणीसाठा 63 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. राज्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये आता 83 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. कोकणात सर्वाधिक 92 टक्के जलसाठा, पुण्यात 88 टक्के, नागपूर 80 टक्के, नाशिक 73 टक्के, अमरावती 71 टक्के आणि मराठवाडा विभागात 40 टक्के पाणीसाठा आहे. जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु असल्याने जलसाठा 53.41 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोयनेच्या जलसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. धरणसाठा 94 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील सातही धरणांमध्ये मिळून 94.87 टक्के पाणीसाठा आहे.