सोलापूर (पंढरपूर): यंदाचा अधिक मास सर्वच दृष्टीने विक्रमी ठरला असून या महिनाभराच्या काळात विठ्ठलभक्तानी (Pandharpur News) तब्बल 7 कोटी 19 लाखांचे भरभरून दान देवाच्या तिजोरीत जमा केले आहे. 15-15 तास उन्हात पाय भाजत आणि पावसातील चिखलातून वाट काढत देवाच्या दर्शनासाठी उभ्या असणाऱ्या गोरगरीब भाविकांनी देवाचा खजिना भरला आहे. आता मंदिर समितीकडून कोणतीही अपेक्षा न ठेवणारा हा विठ्ठल भक्त किमान शासनाने निवाऱ्यात सुलभ दर्शन व्यवस्था उभा करण्याची अपेक्षा व्यक्त करीत आहे. 


यावर्षी  १८ जुलै रोजी अधिक महिन्याला सुरुवात झाली आणि 16 ऑगस्ट रोजी समाप्ती झाली. मात्र पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत रोज आषाढी यात्रेसारखी गर्दी पंढरपुरात दिसत होती. या महिनाभरात जवळपास 1 कोटी भाविकांनी पंढरपुरात हजेरी लावली होती. त्यामुळेच 2018 साली झालेल्या अधिक महिन्याच्या तिप्पट गर्दी या वर्षी झाल्याचे दिसून आले. त्यामुळेच या अधिक महिन्यात विठुरायाच्या खजिन्यात 7 कोटी 19 लाख 43 हजार 37 रुपयांचे दान जमा झाले आहे. सन 2018 सालच्या तुलनेत यावर्षी 4 कोटी 86 लाख 91 हजार 113  रुपयाने उत्पन्न वाढल्याने मंदिराचा खजिना ओव्हरफ्लो झाला आहे. गेल्या अधिक महिन्यात म्हणजे 2018 साली मंदिराला महिनाभरात 2 कोटी 32 लाख 51 हजार 924 रुपयांचे उत्पन्न मिळाले होते . 
           
अधिकमासात सोने-चांदीच्या वस्तू दान करण्याची प्रथा असून यावर्षी तब्बल 24 लाख 98 हजार 890 रुपयांचे सोने आणि 8 लाख 18 हजार 859 रुपयाची चांदी देवाला अर्पण करण्यात आली. देवाच्या चरणावर 54 लाख 82 हजार तर रुक्मिणी मातेच्या चरणावर 19 लाख 12 हजार रुपयाचे दान अर्पण करण्यात आले होते. या महिनाभरात देवाच्या लाडू प्रसादातून 87 लाख 73 हजार रुपयाचे उत्पन्न मंदिराला मिळाले आहे. 


यंदाच्या अधिक महिन्याने जसे गर्दीचे विक्रम मोडले तसे उत्पन्नाचे देखील विक्रम केले असले तरी तासंतास उन्हाचे चटके सहन करत आणि पावसाच्या चिखलातून वाट काढत दर्शन रांगेत उभारणाऱ्या भाविकांनी जशी देवाची तिजोरी भरली तशी आता किमान निवाऱ्यातील सुलभ दर्शन व्यवस्थेची उभारणी करण्याची शासनाकडून असलेली अपेक्षा पूर्ण होणार का असा सवाल हा गोरगरीब भाविक करत आहे.


या महिनाभरात एक कोटी पेक्षा जास्त भाविकांनी पंढरपुरात येऊन चंद्रभागेचे पवित्र स्नान केले. जवळपास साडेसात ते आठ लाख भाविकांना देवाच्या पायावर दर्शन घेण्याचे भाग्य लाभले तर 13 लाख भाविकांना देवाचे मुखदर्शन घेता आले. यातील बहुतांश भाविकांनी मात्र नामदेव पायरीचे किंवा विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन आपला अधिक मास पूर्ण केला.


ही बातमी वाचा: