सोलापूर : सोलापुरातील शास्त्रीनगर परिसरात बुधवारी (16 ऑगस्ट) रात्री साडेअकराच्या सुमारास दगदफेक (Stone Pelting) झाल्याची घटना घडली. रात्री अचानक दोन गट समोरासमोर आले, सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान दगडफेकीत झाले. त्यामुळे काही काळ या परिसरात तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणात पोलिसांनी 10 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
आरोपींची नावं
1) दुर्गादास विजय म्हेत्रे (वय-34 वर्षे, रा. घर 396, उत्तर सदर बझार, सोलापूर), 2) सागर दिपक कोरे (वय 36 वर्षे, रा. घर नं. 307, उत्तर सदर बझार, सोलापूर), 3) प्रशांत हिरालाल सोंडेकर (वय 31 वर्षे, रा. घर नं. 351, उत्तर सदर बझार, सोलापूर), 4) प्रथमेश संजय कोल्लुर (वय 28 वर्षे रा 365, उत्तर सदर बझार, सोलापूर), 5) महेश रमेश कोरे (वय 33 वर्षे रा-3620 उत्तर सदर बझार, सोलापूर), 6) संतोष वसंत मरेड्डी (वय 30 वर्षे रा- 346, उत्तर सदर बझार, सोलापूर), 7) गणेश भारत रोकडे (वय 31 वर्षे रा- ब्लॉक नंबर 30 केशव नगर पोलीस लाईनजवळ सोलापूर), 8) पंकज संजय कोल्लुर (वय 25 वर्षे रा-356, उत्तर सदर बझार, सोलापूर), 9 ) योगीराज राजू म्हेत्रे (वय 29 वर्षे रा 689, सतनाम चौक जवळ, इमानियल चौक, सोलापूर), 10) अरबाज शब्बीर बेपारी रा.394 शास्त्री नगर सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नाव आहेत.
घोषणाबाजीनंतर दोन गटात किरकोळ दगडफेक
सोलापुरात सतनाम चौकातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी निवडीची बैठक बुधवारी रात्री होती. बैठकीनंतर काही कार्यकर्ते चहा पिण्यासाठी शास्त्रीनगर परिसरात आले तिथे आल्यानंतर त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे दुसऱ्या एका गटानेही घोषणाबाजी केली. त्यानंतर दोन्ही गट समोरासमोर आले आणि किरकोळ दगडफेक झाली, अशी प्राथमिक माहिती या प्रकरणात समोर आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी हानी झालेली नाही.
परिसरात तणावपूर्ण शांतता
घटनेची माहिती मिळताच सोलापुरातल्या सदर बाजार पोलीस ठाणाच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी तात्काळ गर्दी पांगवली. त्यानंतर पोलिसांनी जवळपास 10 लोकांना ताब्यात घेतलं. रात्री उशिरापर्यंत सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. नेमकं हे का घडलं याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. मात्र अटक केलेल्या आरोपीविरोधात भा.दं.वि.क. 143, 147, 160, 323, नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी अद्याप ही बंदोबस्त या परिसरात ठेवला आहे.