Prasanna Maharaj Belapurkar Passed Away : श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज (Sant Nivruttinath Maharaj) पालखी सोहळ्याचे मानकरी आणि ज्येष्ठ वारकरी संत वैकुंठवासी शाहू महाराज बेलापूरकर यांचे वंशज ह.भ.प.श्री. प्रसन्न महाराज बेलापूरकर (Prasanna Maharaj Belapurkar) (वय 33 वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने (Heart Attack) दुःखद निधन झाले असून वारकरी (Warkari) संप्रदायासाठी हा मोठा आघात आहे. अतिशय तरुण आणि मनमिळाऊ स्वभावाचे प्रसन्न महाराज यांच्या जिभेवर सरस्वती वास करायची. आपल्या ओघवत्या भाषेत सर्वसामान्यांच्या शब्दात प्रसन्न महाराज कीर्तने करत असल्याने ते वारकऱ्यांमध्ये लोकप्रिय होते. 


डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी
प्रसन्न महाराज यांची वर्षात अमळनेर, पैठण, त्र्यंबकेश्वर आणि कार्तिकी यात्रेची आळंदी अशा सहा पायी वाऱ्या असल्याने जवळपास सहा महिने ते पंढरपूरच्या बाहेरच असायचे. आळंदीची पायी वारी करुन बुधवारी (23 नोव्हेंबर) प्रसाद महाराज पंढरपूरमध्ये पोहोचले होते. आज (26 नोव्हेंबर) पहाटे त्यांच्या छातीत दुखण्यास सुरुवात झाल्यावर उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त करुनही प्रसन्न महाराज यांना वाचवण्यात यश आले नाही. त्यांच्या जाण्याने फडपरंपरा तसेच सकल वारकरी संप्रदायात शोककळा पसरली असून आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांचे चुलत बंधू आणि बेलापूरकर फडाचे गादी अधिकारी मनोहर महाराज बेलापूरकर यांच्यासह आई, भाऊ असा परिवार आहे. 


वारकरी संप्रदायाला मोठा धक्का
प्रसन्न महाराज यांचे शिक्षण बी.ए. पर्यंत झाल्यावर त्यांनी पूर्णवेळ वारकरी संप्रदायाचे काम हाती घेतले होते. वारकरी संप्रदायातील अत्यंत आचरण संपन्न आणि सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय होता. पंढरपूर येथील संत निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे ते काम पाहत असत. बेलापूरकर घराण्याचा मोठा भक्तगण असून वारकरी संप्रदायातील मोठ्या फडांमध्ये या फडाचा समावेश आहे. अतिशय कमी वयात वारकरी कीर्तनकाराचे अशा प्रकारे अकस्मितपणे जाण्याने वारकरी संप्रदायाला आणि त्यांच्या शिष्यवर्गाला मोठा धक्का बसला आहे.


तरुणाईमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं
सध्या तरुणांमध्ये अचानक हृदयाचा झटका येण्याचं प्रमाण वाढताना दिसून येत आहे. मोठ्या संख्येने तरुण हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडत आहेत. विशीमध्ये आणि तिशीमध्येही तरुणांना हृदयविकार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. बदलती जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, जेवणाच्या अनियमित वेळा, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव हे यामागील मुख्य कारणं आहेत.