Adv. Sadavarte: अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत जोरदार राडा झाला. सोलापूर (Solapur) येथे पत्रकार परिषद घेत असताना सदावर्ते (Adv. Sadavarte) यांच्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडकडून (Sambhaji Brigade) शाई फेक करण्यात आली. सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी केल्यानंतर त्यांच्याविरोधात संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. 


सोलापूरमध्ये अॅड. सदावर्ते यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी सुरू होताच काही कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्यावर शाई फेक केली. 


सदावर्ते म्हणजे भाजपचं पिल्लू; संभाजी ब्रिगेडचा हल्लाबोल


गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शाईफेक करणाऱ्या व्यक्तीचं नाव सोमनाथ राऊत असून ते सोलापुरातील संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आहेत. शाईफेकीच्या घटनेवर ते म्हणाले की, "आज संविधान दिवस आहेत. गुणरत्न सदावर्ते हे महापुरुषांच्या या महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले आहेत. या महाराष्ट्रातला लहानातला लहान कार्यकर्ता म्हणून या गुणरत्न नव्हे तर गुणउधळे सदावर्तेचा निषेध करत आहोत. सदावर्ते यांना महाराष्ट्रात कुठेही फिरु देणार नसल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्यावतीने देण्यात आला. सोमनाथ राऊत यांनी म्हटले की, मी त्यांच्या कार्यक्रमात त्यांच्यावर शाई फेकून काळे कापड दाखवून निषेध केला आहे. सदावर्ते म्हणजे भाजपचं पिल्लू आहे. महाराष्ट्र तोडायचा असं भाजपने ठरवलेलं आहे. पण आम्ही ते शक्य होऊ देणार नसल्याचेही त्यांनी म्हटले. 


स्वतंत्र मराठवाड्याची मागणी 


काही दिवसांपूर्वी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठवाडा आणि विदर्भ राज्याची मागणी केली होती. त्यांचा राज्यकारभार स्वतंत्रपणे चालला पाहिजे अशी त्यांनी मागणी केली. स्वतंत्र मराठवाडा राज्यासाठी त्यांनी शुक्रवारी उस्मानाबादमध्ये परिषदही घेतली. या संवाद परिषदेआधीच वातावरण तापले होते. परिषदेचे बॅनर फाडण्यात आले होते. सदावर्ते यांच्या मागणीला संभाजी ब्रिगेड आणि काही संघटनांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर आज सोलापूरमधील पत्रकार परिषदेत त्याचे पडसाद उमटले. 


सीमा प्रश्नावर सदावर्तेंची समिती


दरम्यान, आज सोलापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सदावर्ते यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. सीमा प्रश्नावरून राऊत हे हिंसाचारासाठी चिथावणी देत असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी प्रकरणी आम्ही समिती तयार करत असून जयश्री पाटील या त्याच्या प्रमुख असून मनोज मुदलीयर, राजाराम पाटील आणि
सागर बदगुडे हे सदस्य असतील असेही सदावर्ते यांनी म्हटले. 


पाहा व्हिडिओ: Gunratna Sadavarte Solapur Full PC : सदावर्ते यांच्यावर शाईफेक झाली ती पत्रकार परिषद