Pandharpur News : पंढपुरात (Pandharpur) भर दिवसा स्मशानातील राख चोरीला गेल्याने सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तसचे हे प्रकार तातडीने न थांबल्यास मुख्याधिकारी कार्यालयात अंत्यविधी करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. मृतांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी हिंदू धर्मात त्यांच्या अंगावरील सोनं तसच ठेवलं जातं. त्यामुळे या राखेतून सोनं काढणारी टोळी गेल्या अनेक दिवसांपासून पंढपुरात सक्रिय आहे. त्यासाठी हे चोर स्मशानातील अस्थी चोरुन नेतात. याप्रश्नाला एबीपी माझाने सुरुवातील वाचा देखील फोडली होती. पण तरीही नगरपालिका आणि पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
यामुळे आता सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच पोलीस प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच अशा प्रकारे चोरी करणाऱ्या टोळीला पोलीसांनी लवकरात लवकर ताब्यात घेण्याची मागणी नागरिक करत आहेत. यामुळे नागरिकांच्या भावनेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणण आहे.
राख आणायला गेले तेव्हा चोरी झाल्याचं उघड
गुरुवारी (20 जुलै) रोजी कोळ्याचा मारुती पंढरपूर येथील रहिवासी सौ. प्रभावती रामचंद्र कोरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. यामुळे समस्त कोरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांच्यावर पंढपुरातील स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात आले. पण त्यानंतर जेव्हा त्यांच्या घरचे स्मशानभूमीत राख आणायला गेले तेव्हा ती राख चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
हिंदू धर्मामध्ये प्रत्येक विधीला एक महत्त्व आहे. मृत्यूनंतर देखील काही विधींचे संस्कार सांगण्यात आले आहेत. पण ही टोळी अंत्यसंस्कार झालेल्या मृत व्यक्तीच्या चितेचा अग्नी शांत होण्यापूर्वीच त्यावर पाणी ओतते. त्यानंतर ती राख चोरीला नेली जाते. अशावेळी त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी पुढील विधीसाठी अस्थी कुठून आणयाच्या आणि कशाचे पूजन करायचे असा गंभीर प्रश्न पंढपुरातील अनेक कुटुंबियांसमोर उभा आहे.
'...तर मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यात अंत्यसंस्काराचे विधी करु'
या निंदनीय प्रकाराला पायबंद घालण्यासाठी स्मशानभूमीत एक सुरक्षा रक्षक ठेवाव, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी अनेकदा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पण तरीही पालिका प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचं म्हटलं जात आहे. पण आता नागरिकांचा संताप वाढत चालल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा जर असा प्रकार घडला तर मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांसह मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये अत्यसंस्कारांचे विधी करु असा इशारा सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी दिला आहे. तसेच पोलीस प्रशासनाने या राख चोरांवर कारवाई करुन अशा प्रकाराला पायबंद न घातल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.