Maharashtra School Closed: राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी, पालघर तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या शाळा बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे. 


विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम राहण्याची शक्यता असून हवामान खात्याने या ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्यांतील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत  प्रचंड वाढ झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 


यवतमाळ जिल्हाला रेड अलर्ट


आज सकाळपासून यवतमाळमध्ये संततधार पाऊस सुरू असून हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून बहुतांश रस्ते वाहतुकीस बंद आहेत. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास शालेय विद्यार्थी यांना घरी जाण्यास अडथळा निर्माण होवू नये त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यायेण्यास अडथळा निर्माण होऊ नये तसेच कोणताही अनूचित प्रकार होवू नये याकरिता जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश  जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे.


पालघर जिल्ह्यातील पावसाचा जोर पाहता सर्व अंगणवाड्या तसेच सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


आज काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
 
कोकण : 


पालघर - मुसळधार ते अतिमुसळधार, काही ठिकाणी अतिवृष्टी म्हणजेच 204 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज - रेड अलर्ट. 


ठाणे - काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, ज्यात 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाचा इशारा - ऑरेंज अलर्ट. 


मुंबई - काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज, ज्यात 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पाऊस होऊ शकेल - ऑरेंज अलर्ट. 


रायगड - काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, घाट माथ्यावर 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज - ऑरेंज अलर्ट. 


रत्नागिरी - काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज, ज्यात 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पाऊस होऊ शकेल - ऑरेंज अलर्ट. 


सिंधुदुर्ग - काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा - यलो अलर्ट.


मध्य महाराष्ट्र : 


पुणे - घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा, ज्यात 200 मिमीहून अधिक पावसाची शक्यता - रेड अलर्ट 


सातारा - घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाची शक्यता - ऑरेंज अलर्ट. 


महत्त्वाचे : 


कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात दरडी कोसळ्याची शक्यता 


विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात फ्लॅश फ्लडचा अंदाज 


पुणे शहर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता.


भीमाशंकर, लोणावळा, खंडाळा, कसारा, इगतपुरी, अंधारबन, ताम्हिणी, कुंडेलिका, भोर  या घाट परिसराच पावसाची शक्यता. 


ही बातमी वाचा: