पंढरपूर : सध्या पंढरीचा (Pandharpur) विठुराया (Vitthal Temple) हा महिनाभराच्या विश्रांतीवर पोहचला असून सध्या देवाचा मुक्काम हा विष्णुपद आहे. त्यामुळे जर तुम्ही विठ्ठल दर्शनाला जात असाल तर जा, पण वठुराया हा विष्णुपदावर विश्रांतीसाठी आहे, हे देखील ध्यानात ठेवा. गेल्या शेकडो वर्षांपासून  वारकरी संप्रदाय विठ्ठल रुक्मिणीच्या अनेक धार्मिक परंपरा जपत आले आहे. यातीलच एक प्रथा म्हणजे विष्णुपद होय . 


चंद्रभागेच्या तीरावर गोपाळपूर जवळ असणाऱ्या या निसर्गरम्य ठिकाणी विठुराया संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात मुक्कामासाठी येत असतात. देव महिनाभर या निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या शांत वातावरणात विश्रांती घेतो अशी मान्यता आहे . याबाबतीत अनेक आख्यायिका प्रचलित  देखील आहेत. एका आख्यायिकेनुसार मार्गशीर्ष महिन्यामध्ये देव आपल्या गोपाळांसह चंद्रभागेच्या काठावरील विष्णुपद येथे मुक्कामी जातात.  विठुराया हा श्रीकृष्णाचा कलियुगातील अवतार मनाला जातो . देव येथे आपल्या सवंगड्यांसमावेत गुरे चरण्यासाठी घेऊन येत आणि येथेच गोपाळकाला करीत असे मानले जाते .


मंदिरात देवाच्या पायाच्या खुणा


आजही या मंदिरातील दगडांवर देवाच्या पायाच्या खुणा , काठीच्या आणि काल्याच्या भांड्याच्या खुणा उमटल्या आहेत . याशिवाय ठिकठिकाणी गायीच्या खुरांच्याही खुणा दगडावर दिसत असल्याने या स्थानाला विष्णुपद असं नाव पडलंय. सध्या हजारोंच्या संख्येने भाविक येथे मार्गशीर्ष महिन्यात दर्शनाला येत असतात . चंद्रभागेच्या तीरावर असणाऱ्या या मंदिरात शेकडो भाविक नावेतून नौकाविहार करीत पोहचतात. 


मंदिर सहा महिने पाण्यात आणि सहा महिने बाहेर


दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार विठुरायाचे लाडके भक्त संत ज्ञानेश्वर यांनी समाधी घेतल्यानंतर निराश झालेले भगवंत एक महिन्यासाठी या ठिकाणी आले होते. हे ठिकाण शांत असल्याने ते या ठिकाणी आल्याचं सांगण्यात येतं.  पुराणकाळात नारदमुनींनी विठोबा आणि रुक्मिणीचे भांडण लावले होते. त्यावेळी देखील  देवाने त्यांना पाण्यात उभे राहण्याची शिक्षा दिली आणि सहा महिने पाण्यात आणि सहा महिने बाहेर राहशील असे सांगितले .विष्णुपदाकडे येताना पाण्यात नारदाची मंदिरं आहेत. त्यामुळे सहा महिने हे मंदिर पाण्यात असते तर सहा महिने बाहेर राहते . भाविक नावेतून विष्णुपदाकडे येताना या नारदाचेही दर्शन घेऊन पुढे देवाकडे येतात . 


 विष्णुपदाचे मुख्य मंदिर इ.स. 1640 साली धामणगावकर बुवा यांनी बांधले असून  1785 साली चिंतो नागेश बडवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते . या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे पूर्णतः काळ्या पाषाणातील असून चारी बाजूला मोकळ्या कमानी आणि मध्यभागी भगवान श्रीविष्णूंचे जवळपास तीन-साडेतीन फुटांचे पाऊल आहे. या ठिकाणी दर्शन केल्यावर भाविक जेवणाचा आस्वाद घेतात. घरातून आणलेले जेवण एकत्र करण्याची येथे परंपरा आहे. दरम्यान, विष्णुपद हे  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अंतर्गत येत असून या ठिकाणी सुरक्षेसाठी लाकडी बॅरेगेडिंग आणि इतर सर्व सुविधा समितीकडून करण्यात आली आहे.