पंढरपूर : पंढपुरातील (Pandharpur) विठ्ठल मंदिरात मागील वर्षीच्या ताळेबंधातून अनियमितता  असल्याचं उघड झालं आहे. तसेच मंदिर समिती बरखास्त करून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी गुरुवार 28 डिसेंबर रोजी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी केली. आज पंढरपूर येथील मंदिर समितीच्या ताळेबंधातील गंभीर अनियमिततेची कागदपत्रे दाखवत त्यांनी यास जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील केलीये . 


अहवालातील अनेक गंभीर त्रुटी समोर ठेवताना श्री विठ्ठलाच्या प्राचीन दागिन्यांचे मूल्यांकन आणि त्यांच्या नोंदी न करणे, हो मोठी चूक असल्याचे समोर आणले आहे . प्रसादाच्या लाडूपासून, भक्तनिवास , गोशाळा, शौचालय, आगाऊ रक्कम अशा सर्वत्रच अनागोंदी कारभार असल्याचा आरोप घनवट यांनी केलाय . महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात राजे, महाराजे, पेशवे, संस्थानिक आदींनी श्री विठ्ठल-रुख्मिणी यांना अर्पण केलेल्या 300 हून अधिक प्राचीन आणि मौल्यवान दागिन्यांची ताळेबंदामध्ये नोंद अन् मुल्यांकन नसल्याचे समोर आल्याचे त्यांनी सांगितले .  


एटीएसमार्फत चौकशी करण्याचे निर्देश


असेच अनेक प्रकार या ताळेबंदामध्ये उघड झाल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलीये. तसेच राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाद्वारे किंवा एटीएसद्वारे चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी केली गेलीये. त्याचप्रमाणे  दोषी अधिकारी, कर्मचारी आणि मंदिर समितीतील सदस्य यांवर तात्काळ गुन्हे नोंद करण्यात यावेत, विठ्ठल भक्तांच्या प्रसादासाठी निकृष्ट खाद्यतेल वापरणे, गोशाळेची दुरावस्था, शौचालय न बांधता लाखो रुपये वाया घालवणे, मंदिरातील सोन्याच्या वस्तूंचे मूल्यांकन न करणे, हे अतिशय गंभीर प्रकार आहेत. त्यामुळे वर्तमान समिती बरखास्त करून संबंधित दोषी अधिकारी कर्मचारी यांचे निलंबन करण्यात यावे.अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी केलीये. 


यावेळी वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज, तुळजापूर येथील पुजारी संघाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे अध्यक्ष गणेश लंके, हिंदु जनजागृती समितीचे राजन बुणगे आदी उपस्थित होते.


हिवाळी अधिवेशनात अहवाल सादर


नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा वर्ष  2021-22 चा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सरकारला सादर करण्यात आला. या अहवालामध्ये लेखापरीक्षकांनी मंदिर समितीचा वरीलप्रमाणे अनागोंदी कारभार स्पष्टपणे नमूद करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मुळात वर्ष 1985 साली मंदिराचे सरकारीकरण होऊन 38 वर्षे उलटल्यावरही मंदिरातील प्राचीन अन् मौल्यवान सोन्या-चांदीच्या वस्तू, देवाचे मौल्यवान दागिने यांच्या ताळेबंदामध्ये नोंदी, तसेच त्याचे मूल्यांकन का करण्यात आले नाही असा सवाल केला आहे . तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या दागिन्यांना सील का केले जात नाही ? असे प्रश्न या वेळी सुनील घनवट यांनी उपस्थित केले.


महाराष्ट्र सरकारने सरकारीकरण केलेल्या सर्व मंदिरांतील सोन्या-चांदीच्या सर्व वस्तू, मंदिरांचे भाग आणि दागिने यांचे तातडीने आणि समयमर्यादेत मूल्यांकन करून ताळेबंदामध्ये त्यांच्या नोंदी कराव्यात. लाडू बनवणे, गोशाळेतील खतांची विक्री आदींची चौकशी करून केवळ ठेका रद्द करण्याचा सोपस्कार करण्याऐवजी दोषींवर गुन्हे नोंदवावेत. हे सर्व प्रकार शासकीय मंदिर समितीच्या दुर्लक्षामुळे घडले असल्याचा आरोप करण्यात आलाय. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून 21 मार्च 2017 मध्ये  रेल्वेच्या जागेवर सुलभ शौचालय बांधण्यासाठी 1 कोटी 54 लाख 46 हजार 41 रुपये इतके भाडे निश्चित करण्यात आले आहे. 35 वर्षांसाठी हा करारकरण्यात आला असून यासाठी रेल्वे प्रशासनाला भाड्यापोटी मंदिर समितीकडून वर्षाला 4 लाख  41 हजार 315 रुपये दिले जात आहेत. असे असूनही 5 वर्षांमध्ये सुलभ शौचालय बांधण्यात आले नाही. या नियोजनशून्य कारभारामुळे मंदिराचे 22 लाख 06 हजार 575 रुपये पाण्यात गेले आहेत. इतका अनावश्यक पैसा ज्यांच्या चुकीमुळे वाया गेला, त्यांच्याकडून हा पैसा सव्याज वसूल करण्यात यावा, अशी मागणीही महासंघाचे घनवट यांनी केली.



मंदिर समितीच्या गोशाळेतील गायींच्या नोंदी ठेवण्यात आलेल्या नाहीत. गोशाळेमध्ये कचरा, भंगार, तेलाचे मोकळे डबे ठेवण्यात येतात. लेखापरिक्षकांनी गोशाळेला भेट दिली, तेव्हा 2 गायी आणि 3 वासरे यांना लंपी आजार झाल्याचे आढळले; परंतु त्यांची योग्य ती काळजी घेण्यात आली नाही. गोशाळेतील गायींच्या दुधाच्या विक्रीची नोंद ठेवण्यात येत नाही. गायींचा विमाही काढण्यात आलेला नाही. गोशाळेच्या परिसरात शेणखताच्या तब्बल 30 ट्रॉली लेखापरिक्षकांना आढळून आल्या त्यांचे मूल्य 1 लाख 35 हजार रुपयापर्यंत होते. त्याची वेळच्या वेळी विक्रीही करण्यात आलेली नाही, असा देखील आरोप करण्यात आलाय.  


भाविकांना प्रसादासाठी देण्यात येणारे लाडू बनवण्याचा ठेका मंदिर समितीकडून बचत गटांना देण्यात आला आहे. लाडूमध्ये ड्रायफूड, तसेच पौष्टिक पदार्थ, शेंगदाणा तेल वापरावेत, असल्याचे वेष्टनावर लिहून प्रत्यक्षात त्याचा उपयोग न करणे हा सरळसरळ घोटाळा आहे. तसेच शेंगदाणा तेलाच्या जागी कमी प्रतीचे कॉटनसीड तेल वापरले आहे. विठ्ठलाच्या चरणी श्रद्धेने येणाऱ्या भाविकांना निकृष्ट दर्जाचा प्रसाद देणे, हे पापच आहे. या प्रकरणी मंदिर समितीने केवळ बचत गटांचा ठेका काढून त्यांच्या ठेवी (डिपॉझिट) जप्त करण्याची थातूरमातूर कारवाई केली आहे. याकडे डोळेझाक करणारी मंदिर समितीही तितकीच दोषी आणि पापात सहभागी आहे. तिच्यावरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी केली. याशिवाय मंदिराला देणगी देण्यासाठी आयकर विभागाच्या 80 G  व 12A सवलतीसाठी प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन केले पण कायम रजिस्ट्रेशन साठी अर्जच केला नसल्याचेही त्यांनी दाखवून दिले . मंदिरातील भक्त निवास माणसे पुरविण्याचा ठेका , सुरक्षा रक्षक ठेका आणि भक्त निवासात सुरु असलेल्या हॉटेलबाबत देखील गंभीर आक्षेप असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे घनवट यांनी निदर्शनास आणून दिले . सध्याच्या मंदिर समितीची मुदत संपून 2 वर्षे उलटून गेली असून तातडीने हि समिती बरखास्त करावी व मंदिरातील सर्व आक्षेपाची एसआयटी मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे . 


हेही वाचा : 


Beed News : कांद्यानं शेवटी रडवलंच! बीडमधील शेतकऱ्याचा कांद्याला मिळाला फक्ता एक रुपयाचा भाव