सोलापूर : जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, सामाजिक कार्यकर्त्याकडून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. सोलापूरमध्ये (Solapur) जिल्हा नियोजन समितीची बैठकी आयोजित करण्यात आली होती, आणि याचवेळी या सामाजिक कार्यकर्त्याने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. अंगावर डिझेल ओतून हातात जळता टेंबा घेऊन हा व्यक्ती आत्मदहन करण्यासाठी आला होता. दरम्यान, उपस्थित पोलीस अधिकाऱ्याने समयसूचकता दाखवत या तरुणाच्या हातातून डिझेलची कॅन आणि आगीचा जळता टेंबा ओढून घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दादासो कळसाईत असे या व्यक्तीचे नाव असून, ते सोलापूरच्या माढा तालुक्यातील टाकळी (टे) गावातील आहे. 


सोलापूरमध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. जिल्हा नियोजन समितीची बैठकीच्या पार्श्वभूमीवर अनेक आंदोलकानी आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिले होते. दरम्यान, याचवेळी व्यायाम शाळेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई करण्याच्या मागणीसाठी दादासो कळसाईत या व्यक्तीने आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार तो अचानक हातात एक डिझेलची कॅन घेऊन पोहचला आणि अंगावर डीझेल देखील ओतून घेतले. तसेच, दुसऱ्या हातात आगीचा जळता टेंबा घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी समयसूचकता दाखवत त्याच्या हातातून डीझेलची कॅन आणि आगीचा जळता टेंबा घेऊन ताब्यात घेतले. 


काय आहे प्रकरण? 


दरम्यान, या प्रकरणी दादासो कळसाईत यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "गेल्या दोन वर्षापासून मी व माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्या वैशाली दादासो कळसाईत आहेत. तर, व्यायाम शाळा चोरी प्रकरणी पाच ते सहा वेळा आम्ही आंदोलन केले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसमध्ये निवेदन दिल्यानंतर ऑफिसमार्फत मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद सोलापूर यांना कारवाई करण्यासाठी आदेश दिले होते. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गृहमंत्री फडणवीस व मला कारवाई करतो असे पत्र दिले. मात्र, पुन्हा तालुक्याचे आमदार यांनी फोन करून कारवाई करू नका असे सांगितल्याची गावात चर्चा आहे. तसेच, सोलापूरच्या अधिकाऱ्यांना पाच लाख रुपयांचे पाकीट दिल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे कारवाई होत नाही. सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी एक समिती गठीत केली होती. त्या समितीच्या अहवालानुसार या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तरीसुद्धा का कारवाई केली जात नाही हा मोठा प्रश्न आहे." त्यामुळे आपण आत्मदहन करणार असल्याचा इशारा दादासो कळसाईत यांनी दिला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Solapur Crime : रिक्षाला पाठीमागून भरधाव कारची धडक, रिक्षातून बाहेर फेकल्याने तरुणीचा दुर्दैवी अंत; सोलापुरात भीषण अपघात