बीड : कांदा निर्यातबंदी (Onion Export Duty) निर्णय जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर उमटू लागले. दरम्यान यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत देखील वाढ होत असल्याचं पाहायला मिळालं. पण या कांद्यामुळे अखेर शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलच. कारण बीडमधील (Beed) नेकनूर येथील एका तरुण शेतकऱ्याच्या कांद्याला सोलापूरच्या बाजारपेठेत चक्क एक रुपयाचा भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्याला उरलेला कांदा हा शेतामध्येच बांधावर फेकून द्यावा लागला.
बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील तरुण शेतकरी वैभव शिंदे यांनी दोन एकरावर कांद्याची लागवड केली होती. जेव्हा कांदा विक्रीसाठी आला तेव्हा ते तो कांदा घेऊन सोलापूरच्या बाजारपेठेत विकायला घेऊन गेले. पण बाजारपेठेत कांदा विकायला घेऊन गेल्यानंतर तिथे त्यांच्या कांद्याला एक रुपये किलो प्रमाणे कांद्याला भाव मिळाला. त्यामुळे त्यांना त्यांचा उर्वरित कांदा देखील शेतामध्येच बांधावर फेकून देण्याची वेळ आली.
कांदा निर्यात बंदीची शेतकऱ्यांना फटका
वैभव शिंदे यांनी 80 हजार रुपये खर्च करून दोन एकरावर कांद्याची लागवड केली होती. यामधून त्यांना चार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांना होती. पण केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला. कांद्याची निर्यात बंद झाल्यामुळे कांद्याचे भाव कमी झाले. त्यातच त्यांनी एक टन कांदा हा सोलापूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी नेला. त्यावेळी कांद्याला एक रुपयाचा भाव मिळाला. त्यामुळे त्यांनी पदरचे दोन हजार रुपये खर्च करावे लागले. तसेच त्यांनी उरलेला कांदा हा विक्रीसाठी परवडत नसल्यामुळे शेताच्या बांधावर फेकून दिला.
निर्यातबंदीमुळे कांद्याच्या भावात घसरण
केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानं घाऊक भावात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळं किरकोळ बाजारातही कांद्याचे भाव घसरले आहेत. महाराष्ट्रातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या सरासरी घाऊक भावात घसरण झाली. बाजारात कांद्याच्या घाऊक दरात सुमारे 10 टक्क्यांची घसरण झाली आहे. येत्या काही दिवसात कांद्याच्या भावात आणखी घसरण होऊ शकते असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात घटली
केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर 7 डिसेंबरपासून घसरण सुरु झाली आहे. 6 डिसेंबर रोजी कांद्याचा सरासरी घाऊक भाव प्रतिक्विंटल 3900 रुपये इतका नोंदवला गेला. आता गेल्या 15 दिवसांत दर जवळपास 50 टक्क्यांनी घसरले आहेत. एपीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, निर्यातबंदीमुळे कांद्याची मागणी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.