Pandharpur News : पंढरपूर (Pandharpur) आटपाडी रोडवर शेरेवाडीजवळ भीषण अपघात झाला आहे. रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हल्सची वाट पाहत असणाऱ्या कुटुंबाला भरधाव कारने चिरडलं असून यामध्ये आजीसह नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गाडीच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सांगोला तालुक्यातील शेरेवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी (26 फेब्रुवारी) सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या काळेल कुटुंबाला उडवले आणि त्यानंतर कार थेट दुकानात घुसली. त्यामुळे दुकानाची भिंत कोसळली आणि कार दुकानात जाऊन थांबली. यावेळी द्रौपदा शिवाजी आटपाडकर यांचा गाडीखाली येऊन जागीच मृत्यू झाला. तर नातू दुकानातील भिंतीखाली सापडला. सिद्धेश्वर काळेल असं मृत्युमुखी पडलेल्या पाच वर्षीय नातवाचं नाव आहे. या धडकेत मुलाचे वडील नामदेव काळेल आणि त्याची आई रुक्मिणी काळेल देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सांगोला येथील उपचार सुरु करण्यात आले आहेत. काळेल कुटुंब रोजगारासाठी मुंबई येथे जाणार होते आणि रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हलसची वाट पाहत उभे असताना भरधाव कारने धडक दिली. दरम्यान ही कार एका राजकीय नेत्याशी संबंधित असल्याने अजूनही पोलीस याबद्दल माहिती देण्यास तयार नाहीत.
भंडाऱ्यातील युवकांच्या वाहनाचा मध्य प्रदेशात भीषण अपघात, एकाचा मृत्यू तीन गंभीर जखमी
दुसरीकडे देवदर्शनासाठी गेलेल्या तरुणांच्या वाहनाला मध्य प्रदेशातील खंडवाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. शुभम चौधरी असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर अपघतातील जखमींवर उपचार सुरु आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेला शुभम चौधरी हा भंडारा भाजयुमोचा सचिव होता. शुभम चौधरी याच्यासह त्याचे मित्र सौरभ कूंभलकर, प्रणव बालपांडे, संकेत गोबाडे हे कारने मध्य प्रदेशातील उज्जैन इथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परत येत असताना दुपारच्या सुमारास खंडवाजवळ जावर ते सेलदा मार्गावर गाडीचा समोरचा टायर फुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. यावेळी सौरभ हा गाडी चालवत होता. शुभम चौधरी वगळता इतर सर्वांनी सीटबेल्ट लावले असल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. मात्र शुभमचा या अपघातात मृत्यू झाला. जखमी तिघांवर खंडवा येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.