Ujani dam : गाळ निष्कासन समितीचे अध्यक्षपद रिक्त असल्यानं उजनी धरणातील (ujani dam) गाळ काढण्याचे काम रखडले आहे. निरी या संस्थेने केलेल्या तपासणीनुसार धरणात जवळपास 10.68 TMC गाळ असल्याची माहिती आहे. हा गाळ काढल्यावर कमीत कमी 10 TMC पाणीसाठा वाढणार आहे. या पाण्याचा वापर दुष्काळी भागासाठी करता येणं शक्य होणार आहे. उजनी धरणाच्या निर्मितीपासूनच धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठत असल्यानं क्षमतेएवढा पाणीसाठा धरणात साठवला जात नाही.  


उजनी धरणावर सोलापूर महापालिकेसह अनेक नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. उजनी कालवे आणि जलाशय मिळून मोठ्या प्रमाणावरील जमीन ओलिताखाली येते. याशिवाय अनेक औद्योगिक वसाहतींना उजनी धरणातून पाणीपुरवठा होत असल्यानं शेकडो उद्योग सध्या सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यात सुरु आहेत. मात्र, सध्या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे.


18 जुलै 2022 रोजी एक समिती गठीत


गाळ काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत घेण्याची गरज असल्यानं याचे टेंडर बनवण्यासाठी 18 जुलै 2022 रोजी एक समिती गठीत करण्यात आली होती. उजनीतून गाळ काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्या येणार असल्यानं या समितीला निविदेचा मसुदा आणि अटी शर्ती ठरवण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, या समितीच्या अध्यक्षपदी असलेले अधिकारी बढतीवर गेल्यानं हे काम सध्या थंडावले आहे. उजनीत असलेली गाळ आणि वाळूचे सर्वेक्षण करण्याचे काम 2019 मध्ये मेरी या नाशिक येथील संस्थेनं केलं होतं. त्यांच्या अहवालानुसार उजनीत 10.68 TMC एवढा मोठ्या प्रमाणात गाळ असल्याचा अहवाल देण्यात आला होता. यानंतर हा गाळ आणि वाळू काढण्यासाठी मानक निविदेवर काम सुरु आहे. या निविदेचे काम पूर्ण झाल्यावर शासनाला ही निवड सादर केली जाणार असून, शासनाच्या मंजुरीनंतर गाळ काढण्याचे काम होणार आहे. 


गाळ काढला तर  1 लाख हेक्टरपेक्षा अधिक जमिनीला पाणी मिळणार


उजनीतील गाळ आणि वाळू काढल्यानंतर कमीत कमी  10 TMC पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित होणार आहे. सध्या अनेक दुष्काळी तालुके उजनीतून पाण्याची मागणी करत आहेत.  धरणातील गाळ काढला तर धरणात पूर्ण क्षमतेने म्हणजे 123 TMC पाणी साठू शकणार आहे . त्यामुळं किमान 1 लाख हेक्टरपेक्षा अधिक जमिनीला पाणी देता येणं शक्य होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी दिली.


गाळ काढल्यास उस्मानाबादसह बीड जिल्ह्याला पाणी देता येणार


सध्या मानक निविदा समितीमध्ये अध्यक्षपद मोकळे असल्यानं गाळ काढण्याचे काम थांबले  आहे. तरी शिंदे-फडणवीस सरकारनं हे रिक्त पद तातडीने भरल्यास या कामाला वेग येऊन उजनी धरणातून गाळ काढण्याच्या कामाची सुरुवात होऊ शकेल. जवळपास 1 लाख हेक्टर जमिनीला नव्याने पाणी देता येणार आहे. सध्या मराठवाड्याला देखील 7 TMC पाणी द्यायचे असून, यातून संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला पाणी मिळू शकणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Solapur News : उजनी जलाशयावर फ्लेमिंगोसह इतर परदेशी पाहुण्यांचे आगमन; पर्यटकांची गर्दी