Gautami Patil: मानसिक त्रास आणि फसवणूक केल्याप्रकरणी नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) विरोधात बार्शीत पोलिसात (Barshi Police) तक्रार करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) बार्शी तालुक्यात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गौतमी पाटीलने उशिराने परफॉर्मन्स सादर केला. त्यामुळे 10 वाजल्यानंतर पोलिसांनी शो बंद पाडला. त्यामुळे नुकसान आणि बदनामी झाली असल्याची तक्रार आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी केली आहे. 


सोलापुरातील बार्शी शहरात 12 मे रोजी गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तिच्या कार्यक्रमासाठी चाहत्यांनी खास तिकीटे काढून हजेरी लावली होती. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गौतमी पाटीलने कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. टाळ्या आणि शिट्यांनी तिचं स्वागत करण्यात आले. मात्र, गौतमी पाटील ही परफॉर्मन्स करण्यासाठी रात्री 9.56 वाजता स्टेजवर आली. एकच गाणं झाल्यानंतर पोलिसांनी वेळ संपली म्हणून कार्यक्रम बंद पाडला. मात्र, तिला संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आपले नृत्य सादर करायचे होते. गौतमी पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांनी फसवणूक करून मानसिक त्रास दिल्याचा आयोजक गायकवाड यांनी आरोप केला. गौतमी पाटील आणि तिचा सहकारी केतन मारणे यांच्याविरोधात बार्शी पोलिसात आयोजक गायकवाड यांनी तक्रार दाखल केली. नियोजित कार्यक्रमाला उशिरा येऊन माझी बदनामी करण्याच्या हेतूने फसवणूक केल्याचेही तक्रारदार गायकवाड यांनी आरोप केला आहे. 


विना परवानगी कार्यक्रम आयोजित केल्याने आयोजक राजेंद्र गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर गायकवाड यांनी आता गौतमी विरोधात तक्रार दाखल केली आहे. 


राजेंद्र गायकवाडविरोधात तक्रार 


आयोजक राजेंद्र गायकवाड विरोधात बार्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आयोजक गायकवाड यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र कायदा आणि सुव्यवस्था, संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी काही कागदपत्रांची पूर्तता करण्याचे गायकवाड यांना लेखी कळवले होते. मात्र कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता त्यांनी थेट कार्यक्रम आयोजित केला.  बार्शी (Barshi) शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 188, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135, 37(3) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


गौतमीच्या कार्यक्रमाचं तिकीट होतं 200 रुपये 


राजेंद्र गायकवाड यांनी आयोजित केलेल्या गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाचं तिकीट 200 रुपये होतं. हा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता सुरू होणार असल्याने चाहत्यांनी सहा वाजल्यापासून गर्दी करायला सुरुवात केली होती. पण तिचा कार्यक्रम सुरू व्हायला साडेनऊ वाजले. कार्यक्रम सुरू होताच पोलिसांनी हा कार्यक्रम बंद केला. त्यामुळे तिच्या चाहत्यांना फक्त एकाच लावणीवर समाधान मानावे लागले. चाहत्यांना 200 रुपयांत फक्त एक लावणी पाहायला मिळाली. नेहमीप्रमाणे गौतमीच्या या कार्यक्रमालादेखील चाहत्यांनी खूप गर्दी केली होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: