Pandharpur News : अखेर एबीपी माझाच्या दणक्यानंतर पंढरपुरातील (Pandharpur) तुळशी वृंदावन उद्यानातील (Tulshi Vrundavan Udyan) सर्व संतांची मंदिरे पाडण्यास सुरुवात झाली असून यातील मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्या आहेत. वन विभागाच्या (Forest Department) निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दोन महिन्यात दोन मंदिरे (Temple) कोसळली आणि वारकरी संप्रदायासह शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्र घेतला होता. 


दोन महिन्यात दोन संतांची मंदिरे कोसळली


संपूर्ण गाळ भरुन झालेल्या जमिनीत 2019 मध्ये हे तुळशीवृंदावन उभारले होते. विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना पंढरपूरमध्ये एक अप्रतिम संत उद्यान पाहण्यास मिळावं यासाठी वन विभागाने पंढरपूरमध्ये सहा कोटी रुपये खर्च करुन तुळशी वृंदावन उभे केले होते. याला भाविक आणि पर्यटकांमधून मोठा प्रतिसाद मिळत होतं. परंतु याचवेळी त्याच्या निकृष्ट कामाचे परिणाम समोर आले. इथल्या संत चोखामेळा (Sant Chokhamela) आणि संत एकनाथ महाराजांचे (Sant Eknath Maharaj) मंदिर दोन महिन्याच्या कालावधीत कोसळल्याने खळबळ उडाली होती. यावर विधानसभेत देखील चर्चा झाल्यानंतर वन मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mngantiwar) यांनी याचा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते . 


उर्वरित सहा मंदिरे पाडण्यास सुरुवात


दरम्यान एबीपी माझाने या तुळशी वृदांवन उद्यानातील निकृष्ट दर्जाच्या कामाचे वास्तव दाखवत मार्बलमध्ये बांधलेली इतर हेवी मंदिरे तात्काळ न काढल्यास पुन्हा मंदिरे कोसळू शकतील हे दाखवून दिले. त्यानंतर आता वन विभागाने उरलेली सहा मंदिरे पाडण्यास सुरुवात केली आहे. इथली दुसरे मंदिर कोसळल्यानंतर वारकरी संप्रदाय आणि शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला होता. आमच्या भावना दुखावल्या असून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. 


तुळशी वृंदावन उद्यान भाविकांसाठी सध्या बंद


या उद्यानात श्री यंत्राच्या आठ कोपऱ्यात आठ संतांची मंदिरे उभारली होती. आता यातील दोन मंदिरे कोसळली असून उरलेली सहा मंदिरे पाडण्यात आली आहेत. वन विभागाने आता पडलेल्या मंदिरात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सावता माळी,  संत जनाबाई, संत कान्होपात्रा आणि संत नामदेव यांचीच मंदिरे आहेत. आता यानंतर वन विभाग स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार कमी वजनाचे साहित्य वापरुन आठही संतांची मंदिरे पुन्हा उभारणार आहे. सध्या हे काम सुरु असेपर्यंत तुळशी वृंदावन उद्यान भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.


संबंधित बातमी


Pandharpur News: पंढरपुरात तुळशी वृंदावनात दुसऱ्या संतांचे मंदिरदेखील कोसळले