Pandharpur News: संपूर्ण वारकरी(Varkari) संप्रदायासाठी पवित्रस्थान असलेल्या विठुरायाच्या पंढरीत(Pandharpur) 2019 मध्ये संत उद्यान उभारण्यात आले. या संत उद्यानाला तुळशी वृदांवन असे नाव देण्यात आले होते. यांमुळे वारकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व संतांचे दर्शन घेता येत होते. मात्र आता या तुळशी वृंदावनाची अवस्था फार चांगली नसल्याचं समोर आलं आहे.
विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना पंढरपूर मध्ये एक अप्रतिम संत उद्यान पाहण्यास मिळावी यासाठी वन विभागाने 2019 मध्ये पंढरपूर मध्ये साडेचार कोटी रुपये खर्चून तुळशी वृंदावन उभे केले आहे . याला भाविक आणि पर्यटकातून मोठा प्रतिसाद मिळत असताना आता याच्या निकृष्ट कामाचे परिणाम दिसू लागले आहेत.
संत एकनाथ महारांजांचे मंदिरही कोसळले..
आज तुळशी वृंदावनातील संत एकनाथ महाराजांचे मंदिरही कोसळल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे . काही दिवसांपूर्वी याच बागेतील संत चोखामेळा यांचे मंदिर कोसळल्यावर वन विभागाने आता बाकीच्या मंदिराची तपासणी करून डागडुजी करू असे आश्वासन दिले होते . मात्र हे आश्वासन पूर्ण होण्याच्या आताच आज दुसरे मंदिर कोसळले.
आता याप्रकरणामुळे शिवसेना ठाकरे गट देखील आक्रमक झाले आहेत. आमच्या भावना दुखावल्या असून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या उद्यानात श्रीयंत्राच्या आठ कोपऱ्यात आठ संतांची मंदिरे उभारण्यात आला होती . आता यातील दोन मंदिरे कोसळली आहेत. तर आता उरलेल्या सहा मंदिरांचे अस्तित्व देखील धोक्यात आले आहे . सध्या संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत सावता माळी , संत जनाबाई , संत कान्होपात्रा आणि संत नामदेव यांचीच मंदिरे उरली याठिकाणी उरली आहेत . या घटनेनंतर तातडीने वनविभागाने तुळशी वृंदावनाच्या बाहेर डागडुजीसाठी उद्यान बंद ठेवल्याचा फलक लावला आहे. मात्र त्यानंतरही आता वन विभागाने उरलेल्या संतांच्या मंदिरातील मुर्ती तातडीने हलवून त्यांची दुरुस्ती न केल्यास अजून पुढचे अनर्थ घडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
अधिवेशानात मांडला होता मुद्दा..
तुळशी वृंदावनातील पहिले मंदिर कोसळल्यावर विधानसभा अधिवेशनात यावर चर्चा देखील झाली होती . त्यानंतरही वन विभागाने यात लक्ष न दिल्याने आता दुसरे मंदिर देखील कोसळले आहे. त्यामुळे संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि वारकरी संप्रदाय आक्रमक झाले आहेत.