सोलापूर: उजनी धरणाच्या जलाशयात बुडालेल्या बोटीच्या शोधकार्यात आज एनडीआरएफ (NDRF) ला दिवसभर कष्ट करूनही अपयश आल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी सायंकाळी झालेल्या दुर्घटनेत, धरणात बुडालेल्या एकही व्यक्तीचा शोध लागू शकला नाही. मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान कुगावपासून कळाशीपर्यंत जलवाहतूक करणारी एक बोट बुडाल्याची भीषण (Accident) दुर्घटना घडली. या बोटीतून 7 प्रवसी प्रवास करत होते, पण यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे यांनी पोहोत पोहोत येऊन नदीपात्राचा किनारा गाठला. मात्र, या बोटीतील उर्वरीत 6 प्रवासी बुडाले आहेत. डोंगरे यांनीची या घटनेची माहिती ग्रामस्थ व प्रशासनाला दिली. त्यानंतर, सुरू झालेल्या शोधमोहिमेला आज दिवसभरात यश आलं नाही. 


उजनी धरणातील बोट दुर्घटनेत करमाळा तालुक्यातील झरे येथील जाधव दाम्पत्य व त्यांची दोन लहान मुले, कुगाव येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचा तरुण मुलगा आणि बोट चालक असे एकूण सहा जण बुडाले आहेत. स्थानिकांनी काल रात्रीच्या अंधारातही सर्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, केवळ महिलेची पर्स, मोबाईल आणि लहान मुलांच्या वस्तूच सापडल्या आहेत.  
   
बोट दुर्घटनेतील 6 जणांच्या शोध कार्यासाठी NDRF च्या टीमने आज सकाळपासूनच युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली होती. मात्र, दिवसभर शोध घेऊन देखील त्यांना केवळ 35 फूट खोल पाण्यात अडकून बसलेली बोट सापडली. मात्र, बुडालेल्यांपैकी एकाचाही शोध लागला नाही. दरम्यान, आज सायंकाळी पाचच्या सुमारास पुन्हा एकदा जलाशयात वादळ वारे सुरू झाल्याने एनडीआरएफच्या पथकाला शोधकार्य थांबवावे लागले. दिवसभर जवळपास 12 तास NDRF च्या टीम आणि स्थानिकांनी जलाशयात शोध घेतला. मात्र, आज एकाचाही शोध लावण्यात यश आले नाही. उद्या सकाळी पुन्हा लवकर शोधमोहिमेला सुरुवात होणार आहे. मात्र, या घटनेमुळे करमाळा तालुक्यात शोककळा पसरली आहे. तालुक्यातील प्रत्येकाचं लक्ष उजनी जलाशयातील या घटनेकडे लागले आहे. विशेष म्हणजे नेतेमंडळीही या शोधोमोहिमेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. बोट दुर्घटनेत बुडालेल्यांच्या आठवणीने नातेवाईक व्याकुळ झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  


खासदारही शोधमोहिमेत सहभागी


दरम्यान, सकाळपासूनच खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार रणजित निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन शोधकार्याची मोहिम हाती घेतल्याचंही दिसून आलं. मात्र, प्रयत्नांची पराकाष्टा करुनही आज दिवसभारत एकाचाही शोध न लागल्याने नातेवाईक आणि अत्पजनांचा धीर सुटत चालला आहे.  


हेही वाचा


उजनी अपघाताची ए टू झेड कहाणी, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?