Solapur Airport: सिद्धेश्वर कारखाना वाचवण्यासाठी (Siddheshwar Sugar Factory) आणि बोरामणी विमानतळासाठी (Solapur Boramani Airport) सोलापूरकरांनी विराट मोर्चा काढला. आजच्या या मोर्चात सिद्धेश्वर कारखाना बचाव कृती समितीतर्फे आयोजित या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. आजच्या या मोर्चात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षदेखील सहभागी झाले होते. सोलापूरमध्ये विमानतळ नसल्याचा फटका स्थानिक व्यापारी, उद्योजकांना बसत आहे. त्यामुळे विमानतळ लवकर सुरू करावे अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत होती. 


सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची चिमणी सोलापूरच्या होटगी रोड विमानतळच्या विमानसेवेला अडथळा ठरत असल्याचे प्रशासनाने म्हणणे होते. त्यामुळे विमानतळ सुरू करण्यासाठी कारखान्याची चिमणी पाडून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी सोलापुरात आंदोलन झाले होते. या आंदोलनाला आधी उपोषण, त्यानंतर रास्ता रोको आणि आता विराट मोर्चाने उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. 
 
सोलापुरातील होटगी रस्त्यावर 350 एकर क्षेत्रात विमानतळ अस्तित्वात आहे. त्याला लागूनच सिद्धेश्वर साखर कारखाना आहे. सुमारे 50 वर्षांपासून हा कारखाना कार्यरत आहे. भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अहवालानुसार सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीमुळेच विमानसेवा सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे कारखान्याच्या चिमणीचा अडसर दूर करुन सोलापूरची विमानसेवा सुरु करावी, अशी मागणी केली जात आहे. 90 मीटर उंच असलेल्या चिमणीमुळं विमानसेवा सुरु करण्यात अडथळा येत आहे. सोलापूर महापालिका प्रशासनाने देखील सिद्धेश्वरची चिमणी यापूर्वीच बेकायदेशीर ठरवली आहे. महापालिकेच्या आदेशावर न्यायालयीन लढाई सुरू आहे. आज झालेल्या मोर्चात सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बाजूनेही ऊस उत्पादक सभासद शेतकरी, कारखान्याचे कर्मचारी, सभासद, कारखान्यावर उपजीविका अवलंबून असलेले अन्य घटक रस्त्यावर उतरले आहेत. 


याआधी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडून कारखाना सुरू करण्यासाठी आंदोलने झाली होती. या महिन्यापासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आले होते. विमानतळाच्या मुद्यावरून सोलापूरमधील वातावरण तंग होत असताना आज सिद्धेश्वर कारखाना बचाव कृती समितीतर्फे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोरामणी येथे विमानतळ सुरू करावे अशी मागणी करण्यात आली. या मागणीद्वारे होटगी येथील विमानतळाच्या मागणीला पर्याय देण्यात आला. 


सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे  मार्गदर्शक संचालक तथा माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी म्हटले की, मला आणि कारखान्याला विरोध करण्यासाठी काही मंडळींचे षडयंत्र सुरू आहे. आम्ही सर्व काम नियमानेच करत आहोत, मात्र वारंवार कोर्टात धाव घेऊन काही मंडळी अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पडद्यामागे असलेल्या व्यक्तींचा खुलासा योग्य वेळी करणार, आम्ही संयमाने काम करत आहोत.
मागील अनेक वर्ष आम्ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या सर्वांना लढा दिला. मात्र आता सभासद स्वतःहून रस्त्यावरती उतरत आहेत. आज निघणारा मोर्चा हा सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांचा आहे, याला कुठलाही राजकीय अजेंडा नाही असेही त्यांनी म्हटले. कारखाना वाचवण्यासाठी विधीमंडळातील सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी बोरामणी विमानतळ सुरू होण्यासाठी सभागृहात आवाज  उठवावा अशी मागणी देखील त्यांनी केली. 


या मोर्चाच्या निमित्ताने, कधीकाळी बचावात्मक पवित्रा घेणारे धर्मराज कडादी आज पहिल्यांदाच आक्रमक भूमिकेत दिसले. अनेक वर्षांपासून होणाऱ्या आरोपांना आज रस्त्यावर उतरून धर्मराज कडारी यांनी उत्तर दिल्याची चर्चा आहे. मात्र त्यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चाची सरकार कशा पद्धतीने दखल घेतं हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: