Solapur Airport : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील विमानसेवा  सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी सोलापूर विकास मंचातर्फे मागील 25 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू आहे. विमानसेवा सुरु करण्यात जे अडथळे येत आहेत ते दूर करावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. तर दुसरीकडं सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (Siddheshwar Sugar Factory) सभासद शेतकऱ्यांनी देखील रास्ता रोको आंदोलन सुरु केलं आहे. 'चिमणी बचाव, कारखाना बचाव'च्या घोषणा देत सभासद शेतकरी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. विमानसेवा आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यावरुन सोलापूर जिल्ह्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. सोलापूर विमानतळाचा नेमका वाद काय? आंदोलकांची मागणी काय? यावर कारखान्याचे नेमकं म्हणणं काय? याची सविस्तर माहिती पाहुयात....


नेमका वाद काय?


सोलापुरातील होटगी रस्त्यावर 350 एकर क्षेत्रात विमानतळ अस्तित्वात आहे. त्यालगतच सिद्धेश्वर साखर कारखाना आहे. सुमारे 50 वर्षांपासून हा कारखाना कार्यरत आहे. भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अहवालानुसार सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीमुळेच विमानसेवा सुरू होऊ शकत नाही. त्यामुळं हा चिमणीचा अडसर दूर करुन सोलापूरची विमानसेवा सुरु करावी, अशी मागणी केली जात आहे. 90 मीटर उंच असलेल्या चिमणीमुळं विमानसेवा सुरु करण्यात अडथळा येत आहे. सोलापूर महापालिका प्रशासनाने देखील सिद्धेश्वरची चिमणी यापूर्वीच बेकायदेशीर ठरवली आहे. त्यावर न्यायालयीन लढाई सुरु आहे. दुसरीकडे सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बाजूनेही ऊस उत्पादक सभासद शेतकरी, कारखान्याचे कर्मचारी, सभासद,  कारखान्यावर उपजीविका अवलंबून असलेले अन्य घटक रस्त्यावर उतरले आहेत. 



2009-10 च्या दरम्यान विमानसेवा सुरु झाली होती


2009-10 च्या दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नामुळे विमानसेवा सुरू झाली होती. मात्र किंगफिशर कंपनी आर्थिक नुकसानीत आल्याने विमान सेवा बंद पडली आणि तेव्हापासून ही सेवा बंदच आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर 2016 साली सोलापूर विमानतळचे नाव उडान योजनेअंतर्गत आले. चाचण्याही झाल्या. यामध्ये अडथळा ठरण्याचं प्रमुख एक कारण सांगितलं गेलं ते म्हणजे विमानतळाजवळ असलेली सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी. विमानतळापासून जवळ असलेल्या सिध्देश्वर साखर कारखान्याची कोजनरेशन चिमणी ही विमानसेवेत अडथळा ठरेल असा अहवाल देण्यात आल्याने DGCA ने परवानगी नाकारली. प्रकरण उच्च न्यायालयात गेलं, सर्वोच्च न्यायालयात गेलं, चिमणी पाडण्याचे आदेशही देण्यात आले. मात्र कोणतं ना कोणतं कारण सांगून हे काम आतापर्यंत तसंच रखडलेलेच आहे.



सोलापूर विकास मंच आणि कारखान्याचे सभासद आमने-सामने


सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरुन विमानसेवा सुरू होण्यासाठी बाजूला असलेल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अडथळा असल्याचा अहवाल DGCA ने दिला होता. त्यामुळे या विमानतळावरून विमानसेवा सुरू होऊ शकत नाही. चिमणीचा अडथळा दूर करून विमानसेवा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी सोलापूर विकास मंच तर्फे मागील 25 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू आहे. या उपोषणाच्या विरोधात सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी देखील कारखाना बचाव म्हणत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून आता कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी सोलापूर विजापूर महामार्ग रोखला होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सोलापूर विजापूर महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक जवळपास अर्धा तास थांबली होती. विशेष म्हणजे कारखान्याचे माजी चेअरमन  धर्मराज काडादी हे स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. सोलापूरच्या विकासाच्या नावाखाली सिद्धेश्वर सहकारी कारखाना बंद पाडण्याचे षडयंत्र काही लोकांचे आहे. अशा प्रतिक्रिया आंदोलनात सहभागी शेतकरी आणि धर्मराज काडादी यांनी दिली आहे.


 कारखाना बंद पाडाल तर राज्यभर आंदोलन करणार, लिंगायत समन्वय समितीचा इशारा 


सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना आणि धर्मराज काडादी यांच्या बाबतीत कटकारस्थान सुरु असून हे बंद न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येईल. राज्यतील लिंगायत समाज या प्रकरणात रस्त्यावर उतरेल असा इशारा लिंगायत समन्वय समितीतर्फे देण्यात आला आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सोलापूरच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान आहे. त्याच पद्धतीने धर्मराज काडादी यांची लिंगायत समाजाचे आदर्श मानबिंदू आहेत. त्यांची कोणतीही बदनामी  लिंगायत समन्वय समिती सहन करणार नाही. अशी प्रतिक्रिया लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्व्यक अॅड. अविनाश भोसीकर यांनी दिली आहे. 


धर्मराज काडादींनी पिस्तूल दाखवल्यानं तणाव


सोलापूर विमानसेवेला मुख्य अडथळा ठरणारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात यावी यासाठी गेल्या 25 दिवसापासून सोलापूर विकास मंचने चक्री उपोषण सुरू केले आहे. या उपोषणादरम्यान सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज कडादी यांची मंचाचे केतन शहा यांच्याशी वाद झाला. यावेळी कडादी यांनी पिस्तूल दाखवत गोळी घालेन अशी धमकी दिल्याने तणाव निर्माण झाला आहे. यावरुन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे राज्याचे अध्यक्ष ललित गांधी यांनी कडादी यांना आव्हान दिले आहे. आम्ही काय बांगड्या घालून बसलेलो नाहीत असं गांधी यांनी म्हटलं आहे. आमची माझी इच्छा फक्त सोलापूरची विमानसेवा सुरू व्हावी अशी आहे. साखर कारखाना बंद व्हावा अशी आमची इच्छा नाही, पण आमच्यावर कोणी दबाव किंवा, दडपण आणण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही अशी भूमिका ललित गांधी यांनी ेतली आहे.


धर्मराज काडादी यांचं म्हणणं काय?


सोलापूर विमानतळापेक्षा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना हा जुना आहे. याआधी एकाच रनवेवरून सेवा सुरळीत सुरू होती. 2012 साली एनटीपीसीचा प्रकल्प सोलापुरात आला, एनटीपीसीच्या तीनशे मीटर चिमणीला परवानगी देण्यात आली. आम्ही 2013 पासून परवानगी मागतोय मात्र 2017 पर्यंत आम्हाला परवानगी देण्यात आली नसल्याचे मत कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी व्यक्त केलं आहे. 


सोलापुरात बोरामणी विमानतळ मंजूर आहे, मात्र ते विमानतळ होऊ नये आणि सिद्धेश्वर साखर कारखाना बंद पडावा यासाठी सोलापूर विकास मंचच्या नावाखाली काम केले जात असल्याचा आरोप काडादी यांनी केला आहे. सोलापूरच्या विकासाशी त्यांना काही घेणं नाही. साखर कारखाना आणि धर्मराज काडादी यांना संपविणे हे एकच ध्येय त्यांचे असल्याचा आरोप काडादी यांनी आंदोलकांवर केला होता. 


सरकारनं बोरामणी विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत


सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन  बोरामणी विमानतळ सुरू करण्यासाठी तत्काळ प्रयत्न करावेत अशी मागणी धर्मराज काडादी यांनी केली आहे. मे 2013 मध्ये आम्ही चिमणीच्या बांधकामासाठी तत्वता मान्यता घेतली होती. अंतिम मान्यतेसाठी सोलापूर महानगरपालिकेने DGCA चे पत्र मागितले होते. मात्र, 2017 पर्यंत DGCA ने आम्हाला केवळ 30 मीटरचीच मान्यतेचे पत्र दिल्याची माहिती काडादी यांनी दिली. महानगरपालिकेला हे सगळं प्रकरण माहिती होतं, त्यामुळे आम्ही बेकायदेशीर काहीही केलं नसल्याचे काडादी म्हणाले. चिमणीला महानगरपालिकेने अंतिम मान्यता दिली नसल्याची कबुली धर्मराज काडादी यांनी दिली आहे. मात्र, चुकीचे काही केलं नसल्याचा दावा काडादींनी केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


सोलापूरकरांच्या विमानसेवेत अडथळा! प्रस्तावित विमानतळासाठीचा निर्वनीकरणाचा प्रस्ताव वनविभागाने फेटाळला