Babandada Shinde : सध्या माढा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे ( Babandada Shinde) यांचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. भाषण करताना बबनदादा शिंदे यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळालं. तालुक्यातील जनतेच्या प्रेमाबद्दल बोलताना शिंदे यांना अचानक गहीरुन आलं. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. यावेळी समोर बसलेल्या लोकांच्या डोळ्याच्या कडा देखील पाणावल्याचे पाहायला मिळालं.


माढाचे माजी आमदार आणि पंचायत समितीचे पहिले सभापती कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या कुर्डुवाडी पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणातील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झालं. त्यानंतर आयोजीत करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना आमदार शिंदे यांनी अश्रू अनावर झाले. यावेळी व्यासपीठावर शरद पवार यांच्यासह माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार विनायकराव पाटील हे देखील उपस्थित होते. 


आमदार बबनदादा शिंदे नेमकं का गहिवरले ?


आम्ही दोघे भाऊ आमदार (बबनदादा शिंदे आणि संजयमामा शिंदे), आमचे व्याही अरुण लाड हे आमदार, जावई संग्राम थोपटे हे भोर तालुक्याचे आमदार आहेत. लोकांनी आमच्या कुटुंबावर भरभरुन प्रेम केलं आहे. आम्हाला जनतेनं भरभरुन दिलं आहे. अजून काय पाहिजे. मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही, असं म्हणत सहा वेळा आमदार झालेले बबनराव शिंदे यांना अश्रू अनावर झाले. विधानसभेत दिवंगत विलासराव देशमुख यांच्या दोन मुलानंतर आम्ही दोन भाऊ आमदार आहोत. हा सुद्धा एक योगायोग असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. 


कोण आहेत बबनदादा शिंदे


1) बबनदादा शिंदे हे माढा तालुक्याचे आमदार आहेत
2) 1995 पासून सलग सहा वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले आहे
3) साखर कारखानदारी क्षेत्रातलं मोठं नाव
4) शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून बबनदादा शिंदे यांची ओळख
5) सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यात शिंदे कुटुंबाचा मोठा वाटा


शरद पवार यांचा दौरा चर्चेत


आमदार बबनदादा शिंदे आणि माजी आमदार पाटील यांनी मध्यंतरी दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत भेट घेतली होती. तसेच त्यांचे अभिनंदन देखील कलं होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होते. आमदार शिंदे आणि राजन पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, यावर आमदार शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर आता शरद पवार यांचा माढा तालुक्यात दौरा झाल्यानं बबनदादा शिंदे यांच्याबद्दलच्या सुरु असलेल्या चर्चांना विराम मिळाला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: