Solapur South Vidhansabah Dilip Mane News : सोलापूर (Solapur) जिल्ह्यात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा (Solapur South Vidhansabah) मतदारसंघातून ठाकरे गटाने अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर काँग्रेसकडून इच्छुक असलेले माजी आमदार दिलीप माने यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.  माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिलीप माने यांच्या निवासस्थानी पोहोचलेत. काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ असतानाही ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळं आता काँग्रेसने देखील दिलीप माने यांना एबी फॉर्म द्यावा, अन्यथा माने यांनी अपक्ष निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. 


दरम्यान, आता दिलीप माने कार्यकर्त्यांसमोर काय भूमिका मांडतात हे पाहावं लागेल, कार्यकर्ते सध्या आक्रमक भूमिकेत आहेत. दिलीप माने यांनी सोलापूर दक्षिणमधून निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्ते करताना दिसत आहेत. 


ठाकरे गटापुढे दिलीप माने यांचे बंड रोखण्याचे आव्हान


दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने अमर पाटील यांना एबी फॉर्म दिलाय. काँग्रेस ही जागा लढवण्यावर ठाम आहे. काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने हे या मतदार संघातून इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून धर्मराज काडादी हे इच्छुक आहेत. दोन्ही दिग्गज नेते असताना ठाकरे गटाने अमर पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख विरुद्ध ठाकरे गटाचे अमर पाटील यांच्यात ही लढत होईल. यामुळं आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटापुढे दिलीप माने यांचे बंड रोखण्याचे आव्हान असणार आहे. तर सांगोलामधून दीपक आबा साळुंखे यांना ठाकरे गटाने एबी फॉर्म दिलाय. तर शेकापने बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केलीय. 


विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुर  झाला आहे. भाजपनंतर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शरद पवार गट तसेच शिवसेना ठाकरे गटाने आपापल्या उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र, काही ठिकाणच्या जागांवरुन महाविकास आघाडीत मतभेद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातीलच एक मतदारसंघ म्हणजे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ. यामध्ये काँग्रेसचे दिलीप माने निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, ठाकरे गटानं इथून अमर पाटील यांना उमेदवारी दिल्यानं मोठा पेच निर्माण झाला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


सोलापूर जिल्ह्यात ठाकरेंचा दणका, सांगोल्यात दीपक साळुंखे तर सोलापूर दक्षिणमधून अमर पाटील मैदानात, आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता