Maharashtra Solapur Latest Marathi News update : बार्शीत शेकडो लग्नाळू युवकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वधू विनाच वधू-वर परिचय मेळावा आयोजित करून लग्नाळू युवकांच्या कुटुंबियांची लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप कथित वधू वर मंडळ चालक आणि त्यांच्या एजंटवर करण्यात आला आहे. या संदर्भात बार्शीतल्या पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंद झाला आहे.  


मागील काही दिवसांपूर्वी लग्नासाठी सोलापुरातील लग्नाळूंनी चक्क मोर्चा काढला होता. बेरोजगारी, गरिबी, शिक्षण, वाढत्या अपेक्षा, मुलींचा घटता जन्मदर  अशा कारणामुळे लग्न जमत नसल्याचे  सांगत सोलापुरात नवरदेवांचा मोर्चा देखील निघाला होता. त्यामुळे सोलापूर चर्चेत आलं होतं. आता पुन्हा  हेच सोलापूर लग्नाळूंच्याच आणखी कारणानं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण लग्नाळूंची फसवणूक झाली. पण अशाप्रकाची फसवणूक जर होत असेल तर लग्नाळूंनी जायचं तरी कुठं?


एक नाही दोन नाही जवळपास 200 लग्नाळू युवक आपलं लग्न जमेल या आशेने बार्शीतल्या मंगल कार्यालयात जमले होते. एक एक करून त्यांचं नाव वधू वर मंडळवाले पुकारू लागले. वरमंडळी सगळी तयार होती, पण वधूचा कुठे पत्ताच नाही. सलग तिसऱ्या परिचय मेळाव्यात देखील मुलीच नसल्याने संशयाची पाल चुकचुकली आणि फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.  


बार्शीत राहणाऱ्या अंजली धावणे या महिलेने वधू वर सूचक मंडळ सुरू केले. विवाह इच्छुक असलेल्या तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना काही मुलींचे बायोडाटा पाठवले. मुली आश्रम शाळेतील असून शनिवारी बार्शीतल्या एका मंगल कार्यालयात येणार आहेत, त्यामुळे तुम्ही लग्नाच्या तयारीनेच या असं सांगितलं. लग्नाचा बस्ता आणि सोने खरेदी करून वरमंडळी मंगल कार्यालयात हजर झाली, मात्र वधूचा पत्ताच नाही.   
 
अंजली धावणे यांनी कोणत्याही नोंदणी शिवाय वधू वर सूचक मंडळ सुरू केले होते. सुरुवातीला नोंदणी करण्यासाठी, मुलगी दाखवण्याच्या नावाखाली, डिपॉजिटच्या नावाखाली हजारो रुपये तरुणांच्या कुटुंबांकडून घेतले जात होते. हे पैसे जमा करण्यासाठी एजंटांची नेमणूक देखील करण्यात आली होती. जवळपास 22 जणांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अंजली धावणेसह दोन एंजटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  केवळ सोलापूर, बार्शी नव्हे तर संपूर्ण राज्यात  लग्नासाठी मुली मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आपण ऐकल्या आहेत. बेरोजगारी, गरिबी, शिक्षण, वाढत्या अपेक्षा, मुलींचा घटता जन्मदर  अशा कारणामुळे लग्न जमत नसल्याचे  सांगत सोलापुरात नवरदेवांचा मोर्चा देखील निघाला होता. आणि आता सोलापुरातल्या बार्शीतच लग्नाळू युवकांची आशा पद्धतीने फसवणूक होतेय.