Maharashtra Pandharpur News: चैत्र महिन्यात राज्यभर (Maharashtra News) गावोगावच्या जत्रा आणि यात्रांना सुरुवात होत असते. दरवर्षी शेकडो वर्षांपासून चालत येणाऱ्या परंपरा आजही जपल्या जातात. मात्र यातील काही परंपरा खऱ्या अर्थानं अनोख्या अशाच आहेत. मोहोळ तालुक्यातील (Mohol Taluka) शेटफळ (Shetphal) येथे पाच दिवस सिद्धेश्वर यात्रेचा (Solapur Siddheshwar Yatra) उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. याच यात्रेनिमित्त अनेक अनोख्या प्रथा आणि परंपरा साजऱ्या केल्या जातात. यात्रेनिमित्त गावातील मंदिरासमोर ठरलेल्या वेळत मंडप उभारण्याची अनोखी परंपरा येथे दरवर्षी पार पडते. पण या परंपरेचं वैशिष्ट्य म्हणजे, हा भलामोठा मंडप अवघ्या काही सेकंदात मंदिरासमोर उभा केला जातो. 


यंदाही मंडप अवघ्या काही सेकंदातच उभा करण्यात आला. अवघ्या काही सेकंदात म्हणजे, केवळ 6 सेकंदातच. काल (गुरुवारी) चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती दिवशी गावातील मंदिरासमोर बरोबर अकरा वाजून पाच मिनिटांनी गावातील तीन घराणी आणि बारा बलुतेदार या मंडपाचे चार खांब उभे करून मंडप उभारतात. मानकरी वायुवेगानं मंडप उभा करतात. ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. हा मंडप तब्बल 60 बाय 70 फुट आकाराचा आणि 20 फूट उंचीचा असतो. एवढा मोठा मंडप केवळ 60 सेकंदात उभारण्यात आला आहे. 


यंदाही यात्रेच्या दिवशी गावातील मानाची घराणी आणि बारा बलुतेदार एकत्र आले आणि त्यांनी मंडप उभारण्याच्या कामाला सुरूवात केली. अन् चक्क 60 सेकंदात गावातील मंदिरासमोर भलामोठा मंडप उभा राहिला. सध्या सोशल मीडियावरही मंडप उभारतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


6 सेंकदात मंडप उभारण्याचा चमत्कार गावकऱ्यांनी नेमका केला कसा? 


शेटफळ गावात उभारण्यात आलेल्या मंडपाचे खांब आणि त्यावरील ताडपत्री ही सकाळी बाहेर काढण्यात येते. नंतर गावातील भांगे, डोंगरे, खडके यांच्यासह मानकरी घराणी आपापल्या खांबापाशी येऊन उभे राहतात आणि बरोबर अकरा वाजून पाच मिनिटांनी क्षणार्धात हे खांब आणि मंडप उभा केला जातो. हे दृश्य पाहण्यासाठी परिसरातील गावकरी हजारोंच्या संख्येनं उपस्थिती लावतात. विशेष म्हणजे, यात्रेच्या पाचव्या दिवशी सायंकाळी पाच वाजता देखील असाच 5 ते 6 सेकंदात हा मंडप उभारला जात असल्याचं गावातील मानकरी विजयराज डोंगरे यांनी सांगितलं. पाचव्या दिवशी म्हणजेच, यात्रेच्या शेवटच्या दिवशी भाकणूक होते आणि याच्या सत्यतेची प्रचिती वर्षभर येत राहते. सोलापूर जिल्ह्यातील अत्यंत जागृत असं देवस्थान म्हणून सिद्धेश्वर देवस्थानाची ओळख आहे.