Solapur News:  एप्रिल महिन्यात गावोगावच्या यात्रा सुरू होतात. यात्रेचा उत्सव गावकऱ्यांसाठी (Maharashtra Yatra Celebration) एक आनंदाचा सोहळाच असतो. या यात्रेत गावोगावी वेगवेगळे कार्यक्रम असतात. यातील एक हमखास असणारा कार्यक्रम म्हणजे ऑर्केस्ट्रा. या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाचा (Orchestra Programme) नारळ फोडण्यासाठी लिलाव पद्धतीनं बोली लागल्याची घटना सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यातील केवडमध्ये घडली. यामध्ये भगवान नरहरी लटके यांनी नारळ फोडण्यासाठी तब्बल 55 हजार रूपये मोजलेत. 


नेमका प्रकार काय?


केवड हे माढा तालुक्यात सीना नदीच्या काठावर वसलेलं 2 हजार लोकसंख्या असलेलं गाव. या गावात दरवर्षी श्री काळभैरवनाथ आणि जोगेश्वरीची यात्रा भरते. यावर्षी देखील मोठ्या उत्साहात यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेत उद्या ( 7 एप्रिल) ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे. पण या कार्यक्रमात उद्घाटनाचा नारळ फोडायचा कोणी? असा प्रश्न पडला होता. कारण हा मान घेण्यासाठी गावातील अनेकजण उत्सुक होते. त्यामुळे केवड गावातील यात्रा कमिटीने यात्रेचा नारळ फोडण्यासाठी लिलाव पद्धती ठेवण्याचा निर्णय घेतला. 10 हजार रुपयां पासून लिलाव चालू होतील असा नियम केला. यामध्ये गावातील सहा लोकांनी सहभाग घेतला. 10 हजारापासून सुरू झालेला लिलाव अखेर 55 हजार रुपयांवर थांबला. भगवान लटके यांनी 55 हजार रुपये देत मानाचा फेटा आणि नारळ फोडण्याचा मान मिळवला. 


गावातून काढणार मिरवणूक 


ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम हा उद्या ( 7 एप्रिल) रात्री 9 वाजता होणार आहे. त्यापूर्वी भगवान लटके यांची हलगीच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर ऑर्केस्ट्रा ज्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकानी भगवान लटके यांचा मानाचा फेटा बांधून सत्कार केला जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या हस्ते नारळ फोडून ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.


कोण आहेत भगवान लटके?


भगवान लटके हे केवडचे शेतकरी आहेत. ते गावच्या विकास सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन राहिले आहेत. गावातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कायम त्यांचा सहभाग असतो. या लिलावात गावातील भगवान लटके यांच्यासह शहाजी पाटील, राहुल धर्मे, मारुती धर्मे, गोवर्धन पाटील, संतोष लटके या सहा जणांनी सहभाग घेतला होता.


इतर महत्त्वाच्या बातम्या: