Pandharpur News : पंढरीचा (Pandharpur) विठुराया हा दिनदलितांचा, गोरगरीबांचा शेतकऱ्यांचा देव म्हणून ओळखला जातो. दरवर्षी देशभरातील मोठ्या संख्येनं भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या (Shri Vitthal Rukimini) दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. यामध्ये अनेक दिव्यांग भाविक देखील विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र, या दिव्यांग भाविकांना देवाचं दर्शन घेण्यासाठी असंख्य यातना सहन कराव्या लागतात. एवढे करुनही त्यांना देवाच्या पायाला हात लावण्याचे भाग्य मिळत नाही.  मंदिरासाठी कोट्यवधींच्या योजनांच्या घोषणा करणाऱ्या सरकारनं दिव्यांगांच्या दर्शनासाठी का व्यवस्था केली नाही असा सवाल काही भाविकांनी उपस्थित केला आहे. नागपूरमधील एका आजारी भाविकांच्या झालेल्या त्रासावरुन दिव्यांगांच्या दर्शनाचा मुद्दा उपस्थित केला जातोय.


नागपूरच्या आजारी भाविकाला सोसाव्या लागल्या यातना


आज अक्षय तृतीया आहे. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून देशभरातून हजारोंच्या संख्येनं भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. अशातच सध्या नागपूर येथे स्थायिक झालेले आणि मुलाचे पंजाब येथील असणारे मल्ली कुटुंब आपल्या आईची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी पंढरपूरला आले. मल्ली कुटुंबातील जसविंदर कौल मल्ली यांची आई इंद्रजित कौर मल्ली या सध्या एका दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना हातपाय हलवता येत नाहीत. इंद्रजित यांची प्रकृती खालावत चालली असताना त्यांची शेवटची इच्छा विठुरायाच्या दर्शनाची होती. यासाठी त्यांचे पुत्र जसविंदर कौर मल्ली हे आपले वडील, पत्नी, छोटासा मुलगा यांच्या समवेत आपल्या आजारी आईला घेऊन पंढरपूरमध्ये आले होते. मात्र, दुर्धर आजारी रुग्ण अथवा दिव्यांग असणाऱ्या व्यक्तीला देवाच्या दर्शनासाठी कोणतीच व्यवस्था मंदिर प्रशासनाकडे नसल्याने त्यांना कोठून मंदिरात घ्यावे असा प्रश्न निर्माण झाला.


रुक्मिणी मातेच्या मंदिरात नेण्यासाठी कोणतीच व्यवस्था नव्हती. त्यामुळं त्यांना थेट नामदेव पायरीपासून आपल्या आईला व्हील चेअरसह उचलून विठ्ठल सभामंडपात आणावे लागले. तेथूनही दर्शन रांगेतून वर घेताना पुन्हा सहा पायऱ्यावरुन आजारी आईला उचलून सोळखांबीमध्ये न्यावे लागले. नंतर देवाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचूनही आतल्या व्यवस्थेत त्यांना देवाच्या पायाला स्पर्श करताच आला नाही. हीच अवस्था रुक्मिणी मातेच्या दर्शनाच्यावेळी करावी लागली. प्रकृती गंभीर असणाऱ्या इंद्रजित यांना फक्त विठ्ठल मंदिरात येण्याचे समाधान मानावे लागले. अशाच पद्धतीने दिव्यांग असणाऱ्या भाविकांनाही देवाच्या दर्शनासाठी मरण यातना सोसाव्या लागत आहेत.


दिव्यांगासाठी रॅम्प बनवणे हे कायद्याने बंधनकारक असतानाही व्यवस्था नाही


प्रत्येक शासन विठ्ठल मंदिर आणि भक्तांसाठी कोट्यवधींच्या योजना आणि निधी देत असते. मात्र, आजवर एकही मंदिर समिती अथवा व्यवस्थापनाने असे दुर्धर आजारी असणाऱ्या रुग्णांना अथवा दोन्ही पायांनी दिव्यांग असणाऱ्यांसाठी कसलीच व्यवस्था केलेली नाही. मंदिरात अशा व्यक्तींच्या दर्शनासाठी संपूर्ण व्यवस्था, त्यासाठी यंत्रणा आणि सर्वात महत्वाचे मंदिरात गरजेनुसार दिव्यांगासाठी रॅम्प बनवणे हे कायद्याने बंधनकारक असतानाही अशी व्यवस्था दुर्दैवाने करण्यात आली नाही. विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याच्या पूर्वीच्या रचनेत देखील थोडे बदल केल्यास अशा भाविकांना थेट देवाच्या पायापर्यंत जात येऊ शकते. मात्र, हा विचार ना शासन करते ना मंदिर समिती करते, हीच खंत जसविंदर यांनी बोलून दाखवली. जे भाविक दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी खास व्यवस्था करण्याची अपेक्षा व्यक्त केली .


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरासाठी 73 कोटींचा आराखडा तयार करण्यासाठी पैसे मंजूर केले होते. किमान आताच्या शिंदे-फडणवीस सरकारनं विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या अशा भक्तांसाठी खास व्यवस्था निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता तरी मंदिर समिती आणि मंदिर व्यवस्थापनाला जाग येऊन आजारी रुग्ण आणि दोन्ही पायानी दिव्यांग असणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी नव्याने सुखकर व्यवस्था लागू करावी अशी मागणी होत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Pandharpur News : सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरपूर पुन्हा ओव्हर पॅक, पाच दिवस अवकाळीचा अंदाज तरीही भाविकांची विठ्ठल दर्शनासाठी तुफान गर्दी