सोलापूर: उन्हाळा सुरू होताच यंदा शंभर टक्के भरलेल्या उजनी धरणात केवळ सहा टीएमसी जिवंत पाणी साठा शिल्लक राहिल्याने चिंता वाढू लागली आहे. यंदा पाऊस काळ कमी असल्याचे हवामान खाते सांगत असताना उजनी झपाट्याने कमी होत चालल्याने पुन्हा दुष्काळाची टांगती तलवार सोलापूर जिल्ह्याच्या डोक्यावर राहणार आहे. सध्या कालवा समितीच्या पाणी वाटप निर्णयानुसार कालवा, सिना-माढा बोगदा आणि दहिगाव सिंचन योजनेसाठी पाणी सोडणे सुरू आहे. या हिशोबाने रोज अर्धा टीएमसी पाणी गेल्यास उजनी धरण 4 मे पर्यंत वजा पातळीत जाणार आहे. गेल्या वर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्याने धरण 12 जूनपर्यंत अधिक पातळी होते .
यंदा परतीच्या पावसाऐवजी अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने फक्त तोटा सहन करावा लागला आहे. यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची मागणी वाढू लागली आहे. वाढत्या उन्हामुळे धरणातील एक टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाणी पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. या वर्षी 15 ऑक्टोबरपासून आजपर्यंत 52 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. अजून 20 मे पासून उन्हाळी कालवा पाणीपाळी द्यायची असून आषाढी यात्रेसाठी नदीत 6 टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे.
सध्याची परिस्थितीत उजनी कालवा सल्लागार समितीने आढावा बैठक घेतल्यास उन्हाळ्यासाठी शिल्लक पाण्याचे पुन्हा नियोजन करणे शक्य होणार आहे. उजनी धरण 100 टक्के भरूनही यंदा दुष्काळाची चिंता जाणवू लागल्याने पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी होत आहे . उजनी धरणाच्या वजा पातळीत 64 टीएमसी पाणीसाठा असला तरी यात 10 ते 12 टीएमसी वाळू आणि गाळ असल्याने तेवढा पाणी साठा कमी आहे .
21 एप्रिल 2022 ( गेल्या वर्षी)
एकूण पाणी साठा -- 86.85 टीएमसी
जिवंत पाणी साठा -- 23.19 टीएमसी
टक्केवारी -- 43.29 टक्के
21 एप्रिल 2023 ( चालू वर्षी )
एकूण पाणी साठा -- 69.94 टीएमसी
जिवंत पाणी साठा -- 6.28 टीएमसी
टक्केवारी -- 11.73 टक्के
ही बातमी वाचा: