सोलापूर  : पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेनंतर (Rupee Co-oprative Bank) आता महाराष्ट्रातील आणखी एका को-ऑपरेटिव्ह बॅंकेला आरबीआयने (Reserve Bank Of India) दणका दिला आहे. आरबीआयने सोलापुरातील द लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बॅंक लि. (Laxmi Co-operative Bank)  बँकेचा परवाना रद्द केला आहे. उद्यापासून 23 सप्टेंबरपासून बँकेची सर्व सेवा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे खातेदारांना बँकिंग व्यवहार करता येणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने  22 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढले होते. 


बॅंकिंग नियमांचे पालन करण्यात बॅंक अपयशी ठरली असून बॅंक आपल्या ठेवीदारांसाठी व्यवहार सुरु ठेवण्यास अनुकल नाही असंही आरबीआयने म्हटले आहे. सध्याची परिस्थिती पाहता बँक आपल्या ठेवीदारांना पैसे परत देऊ शकणार नाही असे आरबीआयने आपल्या निर्णयात स्पष्टपणे नमूद केले आहे.  लक्ष्मी बँकेकडे पुरेसे भांडवल  देखील उपलब्ध नसल्याचे बँकेने अहवालात म्हटले. 


लक्ष्मी बँकेमध्ये ज्या खातेदारांचे पैसे आहेत त्यांना डिपॉझिट इन्शुरन्स अँन्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) योजने अंतर्गत पाच लाखांपर्यंतची रक्कम इन्शूअरन्स कव्हर म्हणून दिले जाणार आहेत.  99 टक्के खातेदारांना त्यांच्या सर्व ठेवी परत मिळणार आहे. 13 सप्टेंबरपर्यंत बँकेच्या ठेवीदारांचे 198  कोटी रुपये परत मिळाले आहे. आरबीआयने बँकेवर केलेल्या कारवाईनंतर ग्राहकांना सर्व प्रकाराचे आर्थिक व्यवहार देखील बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे यानंतर बँकेच्या सर्व शाखा बंद होणार आहे. 


मागील काही दिवसांपासून रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून नियमांचं पालन न केल्याच्या कारणावरून रूपी को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेडवर कारवाई करण्यात आली आहे. आता लक्ष्मी बॅंकेला 22 सप्टेंबरपासून टाळं लावलं जाणार आहे.


पुण्यातील रुपी को ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई



भारतीय रिझर्व्ह बँकेने पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा (Rupee Cooperative Bank) परवाना रद्द केला आहे. बँकिंग नियमांचे पालन करण्यात रुपी बँक अपयशी ठरल्याचा ठपका आरबीआयने ठेवला असून रुपी बँकेला 22 सप्टेंबर 2022 पासून बँकिंग कामकाज बंद करण्याचा आदेश दिला आहे.