Solapur News :  सोलापूर शहरात (Solapur City) जड वाहतुकीला सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवेशास बंदी करण्यात आली आहे. मागील काही दिवसात सुरू असलेल्या अपघातांची मालिका पाहता शहरातील युवकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर पोलिस, आरटीओ अधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, जड वाहतूक विरोधी कृती समिती सदस्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी शहरात सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जड वाहतूक बंदचे आदेश काढले. हे आदेश तात्पुरते असून, या आदेशासाठी कोणाची हरकत असल्यास 15 दिवसात हरकत घेण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानंतर कोणतीही हरकत विचारात न घेता अंतिम आदेश काढण्यात येतील, असे पोलीस आयुक्तांनी आपल्या लेखी आदेशात नमूद केले आहे.


ज्या वाहनांच्या नोंदणी पत्रावर नोंदणी प्राधिकारी यांनी वाहनाचा प्रकार म्हणून जड वाहतुक वाहन (HGMV) अशी नोंद केली आहे, अशा जड मालवाहू वाहनांना सकाळी 7 ते रात्री 9 या कालावधीत सोलापूर शहरात प्रवेश करण्यास, वाहतुक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जड मालवाहू वाहनांना देगाव नाका, नवीन होटगी नाका, नवीन विजापूर नाका, नवीन अक्कलकोट नाका, जुना तुळजापूर नाका, मार्केट यार्ड येथून रात्री 11  वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत या कालावधीत सोलापूर शहरात प्रवेश करण्यास व वाहतूक करण्यास परवानगी असणार आहे. मात्र कालावधीत वेगाची कमाल मर्यादा ही जास्तीत जास्त 40 किमी प्रती तास इतकी असणार आहे. 


जड वाहनांच्या वाहतुकीवर असे असणार निर्बंध 


> जुना पूना नाका ते निराळे वस्ती या मार्गावर जड मालवाहू वाहनांच्या वाहतुकीस पूर्णपणे बंदी राहील


> जुना पुना नाका ते छत्रपती शिवाजी चौक मार्गे भैय्या चौक या मार्गावर जड मालवाहू वाहनांच्या वाहतुकीस सकाळी 6  ते रात्री 10 वाजेपर्यंत बंदी


> रेल्वे मालधक्का येथून माल घेवून जाणाऱ्या जड मालवाहू वाहनांसाठी वाहतूक बंदी कालावधीत माल धक्का ते मंगळवेढा या रस्त्याने जाण्यास आणि येण्यास परवानगी असेल


> माल धक्का येथे येणारा धान्यसाठा घेऊन जाण्यास वापरात येणारी जड वाहने यांना रामवाडी गोदाम येथून मोदी बोगदा, मसिहा चौक, पत्रकार भवन चौक, महावीर चौक, आसरा चौक, विमानतळ ते एफसीआय गोडावून, होटगी रोड कारखाना या मार्गाने येण्या-जाणेस परवानगी राहणार आहे.


> सदर वाहनांसाठी पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांची अथवा त्यांनी अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याची लेखी परवानगी घेणे आवश्यक राहील.


> तसेच सदरची वाहने सोलापूर शहराच्या हद्दीतून जाताना ताशी 20 किमीपेक्षा जास्त वेगाने चालविता येणार नाही.


बंदीच्या आदेशातून कोणत्या वाहनांना वगळले?


रुग्णालयाचे उपयोगासाठी ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करणारी जड मालवाहू वाहने, अग्निशमन दलाची जड वाहने, पोलीस दलाची जड वाहने, सैन्य दलाची जड वाहने, ऊस वाहतुक करणारी वाहने, तसेच सोलापूर महानगर पालिकेची साफ-सफाई आणि अत्यावश्यक सेवेसाठी लागणारी वाहने या वाहनांना बंदीच्या आदेशातून वगळण्यात आले आहे. मात्र सदरची वाहने आपत्कालीन कर्तव्यावर असल्याशिवाय ताशी 20 किमी प्रति तासपेक्षा जास्त वेगाने चालविता येणार नाहीत.