Solapur News Update : 'कोल्हाट्याचं पोर' या प्रसिद्ध कादंबरीचे  लेखक दिवंगत डॉ. किशोर काळे ( Dr Kishor Kale) यांच्या आईची घरकुलासाठीची भटकंती अद्यापही थांबली नाही. अधिकारी ते मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यापर्यंत अर्ज-विनंत्या केल्या तरीही राहायला घर मिळत नसल्याची खंत शांताबाई काळे यांनी व्यक्त केली. चाळीस वर्षे लावणी कला जोपासणाऱ्या शांताबाई काळे या आज अत्यंत दयनीय अवस्थेत आयुष्य जगत आहेत. निवृत्त कलावंत म्हणून मिळणारे 1500 रुपये मानधन आणि डॉ. किशोर काळे यांच्या पुस्तकाची रॉयल्टी एवढ्यावरच त्या दैनंदिन उदरनिर्वाह करत आहेत. 


मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर शांताबाई काळे दयनीय परिस्थितीत जीवन जगत आहेत. राहायला स्वतःचे घर नाही. त्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशात त्यांनी भाड्याने पत्र्याची खोली घेतली आहे. त्यामुळे आता भाडं द्यावं की पोट भरावं असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी शांताबाई काळे यांना घर देण्याचे कृतीशील आश्वासन दिले. तेवढ्यावरच न थांबता डॉ. भारुड यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन आवश्यक ती मदत करण्यास सांगितले. त्यावेळी करमाळा तालुक्यातील नेरले येथे त्यांना घरासाठी जागाही उपलब्ध केली. मात्र सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांची बदली झाली त्यानंतर घरचे बांधकाम झाले नाही.


त्यानंतर पुन्हा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी अर्ज विनंती केली. राहायला घर मिळावे यासाठी मागणी केली. त्याचबरोबर मुंबई येथे मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन दिले. काही दिवसांपूर्वीच नागपूर येथे जाऊन हिवाळी अधिवेशनावेळी त्यांनी राहायला हक्काचे घर आणि वेळेवर मानधन मिळावे या मागणीसाठी पाठपुरावा केला. आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या प्रतिनिधींना निवेदन दिले. त्यांनीही कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र आतापर्यंत आश्वासनापलीकडे ठोस अशी कार्यवाही झालेली नाही. माझा मुलगा जिवंत असता तर अशी भटकण्याची वेळ आज माझ्यावर आली नसती. ज्यांच्याकडे श्रीमंती आहेत अशांना शासन घर उपलब्ध करून देत आहे. मात्र आमच्यासारख्या गरिबांकडे लक्ष द्यायला कोणी नाही, अशी खंत शांताबाई काळे यांनी एबीपी माझासोबत बोलताना व्यक्त केली. 


महत्वाच्या बातम्या 


आंबोली घाटात खोल दरीत युवक कोसळल्याचा बनाव उघड, मृतदेहाची विल्हेवाट लावताना आरोपीचा मृत्यू