Solapur News :  उजनी जलाशयात फ्लेमिंगोसह 350 पेक्षा जास्त प्रकारचे आकर्षक परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे. या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी मुंबई, पुणे , नाशिक सह अनेक ठिकाणाहून  पर्यटक उजनीच्या जलाशयाकडे गर्दी करू लागले आहेत. यंदा जलाशयात पाणी पातळी जास्त असल्याने हे परदेशी पक्षी थोडे उशिरा दाखल झाले आहेत. करमाळा , इंदापूर , दौंड , भिगवण परिसरात उजनी जलाशय मधील या रंगीबेरंगी परदेशी पक्षांची विहंगम दृष्य पाहायला मिळत आहेत. 


करमाळा, भिगवण, दौंड आणि नगर जिल्ह्यातील काही ठिकाणी या हजारोंच्या संख्येनी आलेल्या परदेशी पाहुण्यांनी वास्तव्य केले आहे. उजनीचे जलाशय 6 किलोमीटर रुंद आणि 140 किलोमीटर लांब  पसरले आहे. जलाशयात मुबलक नैसर्गिक खाद्य, पक्षांच्या ब्रीडिंगसाठी उपयुक्त हवामान यामुळे सैबेरियासह जगाच्या अनेक भागातून हजारो पक्षी नोव्हेंबर सुरू होताच दाखल होण्यास सुरुवात होतात. यंदा मात्र जलाशयात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने पक्षी उशिरा दाखल झाले आहेत.  यात सगळ्यात मोठे आकर्षण असते ते हजारोंच्या संख्येनी आलेल्या फ्लेमिंगो पक्षाचे. याशिवाय पेंटेड स्टोर्क, ओपन बिल स्टोर्क, पर्पल हेरॉन, ग्रे हेरॉन, सीगल, स्पून बील, लार्ज इग्रेट, नाईट हेरॉन आणि अशाच आकर्षक पक्षांची जत्राच या शांत वातावरणात भरलेली असते. 
         
हे सर्व परदेशी पाहुणे पक्षी पावसाळा सुरू होईपर्यंत या परिसरात मुक्काम करतात. दिवसभर या पक्षांचे नैसर्गिक जीवन अगदी जवळून तर पाहता येते. त्याशिवाय पक्षीप्रेमींना ही एक पर्वणीच असते. सोमवार ते शुक्रवारपर्यंत बहुतांश पर्यटक हे छायाचित्रे काढण्यासाठी आणि या पक्षांचा अभ्यास करण्यासाठी येत असतात. मात्र,  शनिवार आणि रविवार मात्र येथे शेकडोंच्या संख्येने पर्यटक या पक्षांना पाहण्यासाठी आणि येथील चविष्ट मासळीचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. 


या पर्यटन स्थळाची प्रसिद्धी करण्यासाठी करमाळा, भिगवण या परिसरातील तरुण मनापासून झटत असून त्यांनी येथील पक्षांचे आकर्षक फोटोग्राफ आणि माहिती विविध संकेतस्थळावर टाकल्याने आता तर महाराष्ट्र बाहेरून देखील पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. येथील मुख्य आकर्षण फ्लेमिंगो असल्याने इतर आकर्षक पक्षासोबत फ्लेमिंगोचे दर्शन झाल्याशिवाय पर्यटकांचे समाधान होत नाही. 


स्थानिकांना रोजगार मिळण्यास मदत 


याचा चांगला फायदा जलाशयाच्या काठावरील अनेक गावांना होत असून त्या त्या भागात पर्यटन केंद्रे तयार झालेली आहेत. त्यामुळे अशा सर्व ठिकाणी चुलीवरील ताज्या चविष्ट मासळीचे विविध प्रकार देखील या पर्यटकांना खायला मिळत असल्याने खऱ्या अर्थाने सुट्टीचा आनंद पर्यटकांना मिळू लागला आहे. निसर्गाने दिलेल्या या भरभरून वरदानाकडे राज्य सरकारने लक्ष दिल्यास उजनीचा जलाशय देशी आणि विदेशी पर्यटकांच्यासाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकतील असे स्थानिकांना वाटते.