Pandharpur Crime News : सध्या तरुणांना टीव्ही आणि चित्रपट पाहून त्यातील वाईट गोष्टींच्याबाबत आकर्षण वाढत चालले आहे. मात्र, यातून योग्य समज घेण्याऐवजी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे आकर्षण वाढत चालले असल्याचा आरोप केला जातो. हे आकर्षण समाजासाठी चिंतेची बाब ठरत आहे. हे लोण शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही दिसून येत आहे.
गुन्हेगारी जगताच्या आकर्षणाला भुलून गावठी कट्टे बाळगणाऱ्या तरुणांच्या पंढरपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. 'मिर्झापूर' ही वेब सीरिज (Web Series) पाहून पंढरपूरमधील एका तरुणाने उत्तरप्रदेशमधून दोन गावठी कट्टे मागवले. हे गावठी कट्टे कमरेला लावून फिरताना पोलिसांच्या हाती सापडला.
पंढरपुरातील अंबाबाई पटांगणात एक तरुण कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेऊन तपासणी केली. यावेळी त्याच्या कमरेला गावठी कट्टा पोलिसांना आढळून आला. या तरुणाकडे अधिक तपास केला असता त्याचेकडे अजून एक गावठी कट्टा आढळून आला. पोलिसी खाक्या दाखवताच या तरुणाने 'मिर्झापूर' ही वेब सिरीज पाहिल्यावर त्याला गावठी पिस्तुलाचा आकर्षण वाढले असल्याचे सांगितले. त्यानंतर या तरुणाने उत्तर प्रदेशमधील वर्मा नावाच्या मित्राकडून दोन गावठी कट्टे मागवल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.
चंद्रभागा परिसरात हजारो भाविकांची वर्दळ असताना या ठिकाणी असे घातक हत्यारे सापडल्याने पोलीस अलर्ट मोडवर आले असून शहरात असे किती घातक हत्यारे तरुणाई घेऊन फिरत आहे याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. गावठी कट्टे बाळगणारा तरुण हा दुचाकी चोर आहे. त्यानंतर आता रेकॉर्डवरील या गुन्हेगाराची कसून चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे.
मागील महिन्यातही झाली अटक
मागील महिन्यात, गुन्हेगारीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेले दोन तरूण कमरेला पिस्तूल लावून रस्त्यावरून फिरत असल्याचे समोर आले होते. पंढरपूर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली. अजय खाडे आणि गणेश शिंदे अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे होती.
मंगळवेढा रोडवर अजय खाडे हा तरुण पिस्तूलसह फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या कमरेला गावठी बनावटीचे पिस्तूल पोलिसांना आढळून आले.
पंढरपूर शहरातील संत पेठ भागात राहणाऱ्या गणेश शिंदे या तरूणाला पिस्तूलसह कॉलेज चौकातून पोलिसांनी ताब्यात घेतले. एकाच दिवशी घडलेल्या या घोन्ही घटनांमुळे पंढरपूर शहरात पुन्हा गुंडगिरी डोके वर काढतेय का? असा प्रश्न उभा राहिला होता.