सोलापूर : काँग्रेसकडून सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 पैकी 6 जागांवर दावा करण्यात आला आहे. त्यामधील सर्वच्या सर्व सहा जागा या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील असल्याची माहिती आहे. काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडे बैठकीत ही मागणी केली. शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मागणीला काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील दुजोरा दिलाय.
प्रणिती शिंदे विजयी झालेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभेच्या जागेवर काँग्रेसने हा दावा केलाय. काँग्रेसच्या या दाव्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये काहीशी नाराजी होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा
महाविकास आघाडीनुसार शहर उत्तर विधानसभा ही राष्ट्रवादीची पारंपरिक जागा आहे. या जागेसाठी माजी महापौर तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते महेश कोठे हे इच्छुक आहेत. त्यांनी काँग्रेसच्या या दाव्यानंतर काँग्रेस नेत्यांना सल्ला दिला. प्रत्येक पक्ष आपला दावा करू शकतो, मात्र मित्र पक्षात कटुता येणार नाही अशी काळजी घ्यावी अशी प्रतिक्रिया महेश कोठे यांनी दिली.
नरसय्या आडमांचं काय होणार?
माकपचे नेते नरसय्या आडम हेदेखील विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. या आधी सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघामधून प्रणिती शिंदे या आमदार होत्या. आता त्या खासदार झाल्याने या जागेवर आपल्याला संधी मिळावी अशी नरसय्या आडम यांनी इच्छा व्यक्त केली आहे.
नरसय्या आडम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता. महाविकास आघाडीने ही जागा आपल्याला सोडावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
जागावाटपाबाबत चर्चा सुरू
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीत चर्चा सुरु आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जो पक्ष ज्या ठिकाणी निवडून येईल त्या ठिकाणी त्या पक्षाचा उमेदवार उभा करायचा अशा प्रकारची चर्चा सध्या महाविकास आघाडीत सुरु आहे. त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष किती जागा लढवेल यापेक्षा कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल यावर अधिक भर दिला जाणार असल्याचं बोललं जात आहे.
ही बातमी वाचा: